महामार्गावरील कॅश व्हॅनमधील लुटीचा उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 02:32 AM2018-06-22T02:32:14+5:302018-06-22T02:32:14+5:30
पिस्तुल आणि चाकूच्या धाकावर सायन-पनवेल महामार्गावर कॅश व्हॅनची लूट करून पसार झालेल्या टोळीला मानखुर्द पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई : पिस्तुल आणि चाकूच्या धाकावर सायन-पनवेल महामार्गावर कॅश व्हॅनची लूट करून पसार झालेल्या टोळीला मानखुर्द पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून लाखोंचा ऐवज जप्त केला. यामध्ये सागीर शेख (४०) , डेव्हिड लॉरेन्स (३३), जगदीश सुवर्णा (४९), संतोष राजपूत (३०) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावर तिकिटांची रक्कम जमा करण्याचे काम गोरेगावमधील सिक्युरिटी ट्रान्स या खासगी कंपनीकडे होते. १३ जून रोजी मानर्खुद रेल्वे स्थानकातून गोळा झालेली ५२ लाखांची रक्कम घेऊन निघाले. कारमध्ये कंपनीच्या व्यवस्थापकासोबत एक सुरक्षा रक्षक आणि कारचालक असे तिघे जण होते. या टोळीने महामार्गावर गाडी अडवली. एका महिलेच्या प्रसंगावधानामुळे पोलिसांना ही बाब समजली. पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने लक्षात येताच आरोपींनी चॉपर आणि पिस्तूलाच्या धाकावर कारमधील १६ लाख ६१ हजार २१२ रुपये भरलेली बॅगा घेऊन मारुती अल्टो कारमधून पळ काढला. उर्वरित रक्कम वाचविण्यास पोलिसांना यश आले. हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद होता. कारचालक वैभव चव्हाण याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे तपासादरम्यान गोवंडीतील आगारवाडी परिसरात ही कार बेवारस अवस्थेत सापडली. लुटारुनी ती नेरुळ परिसरातून चोरल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.