डिश टीव्ही, वाहनतळास नकार देणे सोसायटीला भोवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 06:20 AM2019-05-26T06:20:00+5:302019-05-26T06:20:10+5:30
वाहनतळ उपलब्ध करून न देता, त्याला मानसिक त्रास देणाऱ्या कुर्ला येथील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेला अतिरिक्त मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने चांगलाच दणका दिला.
मुंबई : सोसायटीच्या सदस्याला गच्चीवर डिश टीव्ही अँटेना लावण्यास मनाई करून व वाहनतळ उपलब्ध करून न देता, त्याला मानसिक त्रास देणाऱ्या कुर्ला येथील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेला अतिरिक्त मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने चांगलाच दणका दिला. संबंधित सोसायटीने कर्तव्यात कसूर केल्याचे म्हणत सोसायटीला संबंधित सदस्याला २० हजार रुपये मानसिक त्रासापोटी देण्याचा आदेश दिला.
कुर्ला येथील नेहरू नगरमधील ओम सिद्धेश्वर को-आॅप हाउसिंग सोसायटीमधील एका सदस्याने केबलची सुविधा समाधानकारक नसल्याने सोसायटीच्या गच्चीवर डिश टीव्ही अँटेना बसविला. मात्र, सोसायटीच्या सर्व सदस्यांनी एकमताने ठराव मंजूर करीत संबंधित सदस्याचा डिश अँटेना गच्चीवरून हटविला. तसेच संबंधित सदस्याने वाहनतळ व भाग प्रमाणपत्र मिळण्याबाबत सोसायटीकडे वारंवार निवेदन पाठवूनही सोसायटीने त्यांना ते देण्यास नकार दिल्याने संबंधित सदस्याने ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवर सोसायटीने आक्षेप घेतला. तक्रारदाराने परवानगी न घेता गच्चीवर डिश टीव्ही अँटेना बसविला. तसेच अँटेनाच्या तारा तोडल्याने त्यासाठी ८०० रुपये खर्च आल्याचा कोणताही पुरावा तक्रारदाराने सादर केला नाही. त्याशिवाय सोसायटीतील केवळ ८ जणांना स्टिल्ट पार्किंगची सुविधा आहे. उर्वरित सदस्य सोसायटीच्या खुल्या आवारात आळीपाळीने वाहने पार्क करतात. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार रद्द करावी, अशी विनंती सोसायटीने ग्राहक मंचाला केली.
मात्र, ग्राहक मंचाने सोसायटीचा युक्तिवाद फेटाळला. तक्रारदाराने उपलब्ध असलेली केबलची सुविधाच वापरावी, यासाठी संस्थेतर्फे सक्ती करण्यात आली, असे मत मंचाने नोंदविले. ‘तक्रारदाराने केबल की डिश टीव्ही निवडावा, यासाठी संस्था जबरदस्ती करू शकत नाही. केबल सुविधा वापरासाठी सक्ती करणे, या प्रकारामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे केबल चालकाशी हितसंबंध आहेत, अशी शंका घेण्यास वाव आहे,’ असे मतही मंचाने नोंदविले.
>वाहनतळ उपलब्ध करणे हे कर्तव्य
वाहनतळाबाबत बोलताना मंचाने म्हटले की, स्टिल्ट पार्किंग आणि संस्थेच्या खुल्या जागेवरील पार्किंगच्या सुविधेवर संस्थेच्या सर्व सदस्यांचा समान अधिकार असतो. त्यामुळे संस्थेच्या सर्व सदस्यांना वाहनतळ उपलब्ध करू देणे, संस्थेचे कर्तव्य आहे. त्यामुळे संस्थेने संबंधित सदस्याला आळीपाळीने वाहनतळ उपलब्ध करून द्यावे, असे मंचाने नमूद केले.
>डिश टीव्ही अँटेनामुळे गच्चीचे काय नुकसान झाले, याची माहिती देण्यास संस्था अपयशी ठरली. त्याउलट तक्रारदाराने त्यांचा डिश टीव्ही अँटेनाची वायर कापल्याने त्या दुरुस्तीसाठी ८०० रुपयांचा खर्च आल्याची पावती सादर केली. तक्रारदाराने डिश टीव्ही अँटेना लावल्यामुळे त्याला भाग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे धाव घ्यावी लागली. त्यांनी आदेश देऊनही संस्थेने तक्रारदाराला भाग प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई केली. या एकंदरीत प्रकरणावरून संस्थेतील पदाधिकारी व तक्रारदार यांच्यात बेबनाव असल्याचे स्पष्ट होते. परंतु, केवळ सर्वसाधारण सभेत बहुमताचा ठराव मंजूर करून तक्रारदारसारख्या सभासदांना सेवा, सुविधांपासून वंचित ठेवणे व सदस्यास वेठीस धरणे, ही बाब गृहनिर्माण संस्थेची सेवा, सुविधा पुरविण्यास कसूर व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब या सदरात मोडते, असे म्हणत ग्राहक मंचाने संबंधित गृहनिर्माण संस्थेला तक्रारदाराला तक्रारीचा खर्च, मानसिक त्रास आणि डिश टीव्ही अँटेना दुरुस्त करण्यासाठी आलेला खर्च म्हणून एकूण २० हजार रुपये देण्याचा आदेश दिला.