"दिशा सालियानची हत्या नाही, तर अपघाती मृत्यू"; राऊत म्हणाले, "५ वर्षांनी दबाव होता म्हणता मग..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:00 IST2025-03-20T10:11:17+5:302025-03-20T11:00:04+5:30
दिशा सालियान प्रकरणात पुन्हा आदित्य ठाकरेंवर आरोप झाल्यानंतर संजय राऊतांनी भाष्य केलं.

"दिशा सालियानची हत्या नाही, तर अपघाती मृत्यू"; राऊत म्हणाले, "५ वर्षांनी दबाव होता म्हणता मग..."
Sanjay Raut on Disha Salian Case: सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी सतीश सालियान यांनी याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टाकडे केली. या याचिकेत दिशा सालियनच्या वडिलांनी शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. गँगरेपनंतर दिशाची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. यावर आता ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. औरंगजेब प्रकरण सरकारवरच उलटल्याने दिशा सालियान प्रकरण आणल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी सतीश सालियन यांनी हायकोर्टाकडे केली आहे. यासोबतच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली. यावर प्रतिक्रिया देताना दिशा सालियानचा अपघाती मृत्यू झाला होता असं संजय राऊत यांनी म्हटलं.
"दिशा सालियान यांच्या वडिलांचं पाच वर्षांनी म्हणणं आहे की आमच्यावर दबाव होता. याच्यावर कसा विश्वास ठेवणार आहात. ठाकरे कुटुंबाला, शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. औरंगजेब प्रकरण सरकारवरच उलटलं. औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या चार दिवसापासून शिजत आहे. यामागे कोणाची प्रेरणा आहे आणि कोण पडद्यामागे आहे याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. अशा प्रकारचे राजकारण तुम्ही करणार असाल तर ते तुम्हालाच लखलाभ ठरो," असं संजय राऊत म्हणाले.
"एका तरुण नेत्याच्या भविष्यावर अशाप्रकारे चिखल उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आमच्यासारख्या अनेक नेत्यांवर हे प्रयोग झाले त्यातून तुम्हाला काहीही निष्पन्न झालं नाही. तरीही तुमचे आयटी सेल काम करत आहे. पण कोणत्या थरापर्यंत जायचं हे एकदा महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी ठरवायला पाहिजे," असंही संजय राऊत म्हणाले.
"पोलिसांच्या तपासानुसार हा अपघात होता. हे हत्येचे प्रकरण नाही. पाच वर्षांनी दिशा सालियानच्या वडिलांनी याचिका दाखल केली आहे. पण या मागे काय राजकारण आहे हे सगळ्या राज्याला माहिती आहे. प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. औरंगजेबाच्या कबरीचे प्रकरण दाबण्यासाठी दिशा सालियान प्रकरण बाहेर काढण्यात आले आहे," असं संजय राऊत यांनी म्हटलं.