Join us

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणी CBI चा मोठा खुलासा, अनेक दावे ठरले खोटे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 9:26 PM

गेल्या काही दिवासांपासून राज्यात पुन्हा एकदा दिशा सालियान प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे.

मुंबई- गेल्या काही दिवासांपासून राज्यात पुन्हा एकदा दिशा सालियान प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. याचदरम्यान आता सीबीआयने या प्रकरणाबाबत मोठी अपडेट दिली आहे. दिशा सालियान प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नाही, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. 

दिशा सालियान प्रकरण सीबीआयकडे कधीही सोपवण्यात आलं नाही. त्यामुळे सीबीआयने कुठलाही तपास केला नाही. दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा नावाने फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. महत्वाचं म्हणजे दोन दिवसांआधीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे नव्हतो, तो तपास मुंबई पोलिसांकडे होता, असा खुलासा केला होता.

केंद्रात राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंह प्रकरणानंतर एयु नावाचे ४४ फोन कॉल झाल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्रात मोठी घडामोड घडली आहे. दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी नव्याने चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दिल्लीहून दिशा सालियन प्रकरणी चौकशी अहवाल मागवून घेण्यात येणार आहे. तो पाहून पुढील चौकशीचे स्वरुप ठरविले जाईल, कोणाकडे अधिकचे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत, असे फडणवीस म्हणाले आहेत. 

नितेश राणे काय म्हणाले होते?

एका मुलीचा संशयास्पद मृत्यू होतो आणि त्याची चौकशी मुंबई पोलीस करतात. त्या चौकशीत दोनदा तपास अधिकारी बदलला जातो. ८ जूनच्या रात्री कोण कोण उपस्थित होता. कुणाच्या राजकीय दबावापोटी हे प्रकरण दडपण्यात आले. दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे नसून मुंबई पोलिसांकडे ही केस आहे. सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आले. ८ जूनच्या पार्टीत कोण होते? या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्या रात्री कुठला मंत्री होता? काहीतरी लपवण्यासाठी विरोधक गोंधळ घालतायेत का? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी केला.  सरकारने या प्रकरणाची फेरचौकशी करावी अशी मागणी सत्ताधारी आमदारांकडून करण्यात आली.

नेमकं प्रकरण काय?

दिशा सालियान या अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या व्यवस्थापक होत्या. ८ जून २०२०ला मुंबईमध्ये घराच्या बालकनीमधून खाली पडून दिशा यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूपूर्वी दिशाने आपल्या लंडनमधील एका मैत्रिणीला फोन केला होता. आपल्या मैत्रिणीशी बोलताना दिशा थोडी चिंतेत वाटत होती. वर्कलोड जास्त असल्याचं तिने आपल्या मैत्रिणीला सांगितलं. त्यानंतर थोड्याचवेळात तिचा होणारा नवरा रोहन याने दिशा ज्या खोलीत राहात होती त्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दिशा त्या खोलीमध्ये नव्हती. त्याने खिडकीतून खाली पाहिलं असता दिशा पडलेली दिसली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :देवेंद्र फडणवीसआदित्य ठाकरेनीतेश राणे गुन्हा अन्वेषण विभाग