दिशाच्या आरोपींना सोडणार नाही, आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याचा निर्णय...; शंभूराज देसाईंची रोखठोक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:02 IST2025-03-26T15:28:30+5:302025-03-26T16:02:51+5:30
दिशा सालियन यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनंतर आदित्य ठाकरे राजीनामा देणारा का, असा प्रश्न आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केला होता.

दिशाच्या आरोपींना सोडणार नाही, आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याचा निर्णय...; शंभूराज देसाईंची रोखठोक भूमिका
Shambhuraj Desai: मुंबईतील दिशा सालियान या तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. दिशाच्या आई-वडिलांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तिच्या हत्येत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप केल्याने राजकीय खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आज विधिमंडळात आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
"दिशा सालियान हिचे वडील सतीश सालियान आणि तिच्या आईने काल पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आमच्या मुलीच्या हत्या प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या हत्येत सहभागी असल्याच्या संशयावरून वाद झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता तर दिशा सालियान हिच्या वडिलांनीच आदित्य ठाकरेंचा त्यांच्या मुलीच्या हत्येत सहभाग असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे नैतिकता म्हणून राजीनामा देणार का? किंवा अध्यक्ष महोदय, आपण त्यांच्यावर काही कारवाई करणार का?" असा प्रश्न आमदार संजय गायकवाड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उपस्थित केला. त्यावर सरकारच्या वतीने मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं.
"आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्यावर त्यांच्या पक्षाने निर्णय घ्यावा"
शंभूराज देसाई म्हणाले की, "आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाबाबतचा प्रश्न उपस्थित केला आहे. दिशाच्या वडिलांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि आदित्य ठाकरे हत्येला जबाबदार असल्याचं म्हटलं. याबाबत आज माध्यमांमध्ये बातम्याही छापून आल्या आहेत. आदित्य ठाकरेंवर माझा आरोप नाही, दिशाच्या वडिलांनी जे म्हटलंय ते मी कोट करतोय. या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड आज सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यायला हवा, अशी भावना आमदार गायकवाड यांनी व्यक्त केली. परंतु नैतिकतेच्या आधारे आदित्य ठाकरेंचा आमदारकीचा राजीनामा घ्यायचा की नाही, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. सरकार म्हणून आम्ही त्यावर भूमिका मांडणार नाही. पण पहिल्या दिवसापासून सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे की, या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही," असं देसाई यांनी स्पष्ट केलं.
दिशा सालियन प्रकरणात जे आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा होईल ही राज्य सरकारची भूमिका आहे. नैतिकतेच्या आधारे आदित्य ठाकरे यांचा राजीनामा घ्यावा की नाही हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे.
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) March 26, 2025
मा. शंभुराज देसाई, पर्यटनमंत्री #Shivsena#JusticeForDisha#ShambhurajDesaipic.twitter.com/pV8nvJAK9C
दरम्यान, "या प्रकरणाची एसआयटी करत असलेली चौकशी क्लोज केलेली नाही, असे आमचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत सांगितलं आहे. त्यामुळे दिशा सालियान यांच्या वडिलांनी पोलिसांकडे काही तक्रार दिली असेल, अधिकची माहिती दिली असेल, संशय व्यक्त केला असेल तर त्या सगळ्याचा अहवाल पोलिसांकडून अहवाल मागवला जाईल आणि ही माहिती एसआयटी चौकशीच्या माध्यमातून न्यायालयासमोर आणली जाईल," असंही शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे.