Join us  

नारायण राणे- नितेश राणे यांच्या अडचणी वाढणार? दिशा सालियनच्या कुटुंबीयांचे राष्ट्रपतींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 3:40 PM

Disha Salian News : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचा मुलगा नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी पत्रात केली आहे.

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची ( Sushant Singh Rajput) माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या (Disha Salian) कुटुंबीयांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचा मुलगा नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी पत्रात केली आहे. मुलीच्या मृत्यूवरून राजकारण केले जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

28 वर्षीय दिशा सालियन हिने 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत आपल्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. दरम्यान, दिशा सालियनच्या मृत्यूवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खळबळजनक दावा केला आहे. एका पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी दिशा सालियनची सामूहिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आल्याचा दावा केला. मात्र दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी त्याचा इन्कार केला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवलेल्या पत्रानुसार, 'आम्ही तुम्हाला विनंती करतो की अधिकाऱ्यांना योग्य ती पावले उचलण्याची सूचना द्यावी जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल. नाहीतर आम्गही आमचे जीवन संपवू', असे कुटुंबीयांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, दिशाची आई वासंती सालियन यांनी भावनिक आवाहन केले. राजकारण्यांनी माझ्या मुलीच्या मृत्यूसंबंधी परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून तिचे नाव बदनाम करू नये, असे आवाहन केले. तसेच, 'मी माझी मुलगी गमावली आहे. हे लोक आमची बदनामी करत आहेत. हे लोक माझ्या मुलीचे नाव राजकारणात ओढत आहेत. ते थांबले पाहिजे. आम्हाला शांततेत जगू द्या', असे त्या म्हणाल्या. 

दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, सुशांत सिंह राजपूत व्यतिरिक्त दिशा सालियन ही भारती सिंह, रिया चक्रवर्ती आणि वरुण शर्मा यांचे काम पाहत होती. गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी दिशा सालियन प्रकरणाचा तपास बंद केला होता. पोलिसांचे म्हणणे आहे की, दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूसंबंधी आरोप केल्याप्रमाणे कोणताही संबंध आढळला नाही.

टॅग्स :नारायण राणे नीतेश राणे