गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: दिशा सालीयन (२८) प्रकरणी चौकशी करणाऱ्या मालवणी पोलिसांनी पुन्हा नव्याने सगळा तपास सुरू केला आहे. त्यानुसार दिशाचा मृत्यू झाला त्या ८ जुलै,२०२० च्या रात्री इमारतीत आलेल्या प्रत्येकाची ओळख पटवत त्यांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच नोंद झालेल्या जबाबाना पोलीस उपायुक्त पुन्हा पडताळून आहेत.
दिशा ही मालाडमधील जनकल्याणनगरच्या गॅलेक्सी इमारतीत १२०२ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मित्रांसोबत पार्टी करत होती. त्याच रात्री साडे बाराच्या सुमारास ती खाली कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. त्यानुसार मालवणी पोलिसांनी ८ जुलै, २०२० ते ९ जुलै, २०२० या काळात इमारतीमध्ये जे कोणी बाहेरील व्यक्ती आले त्यांची ओळख सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पटवली. त्यानंतर त्या सर्वांना संपर्क करत बोलावुन नंतर त्यांची चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच पंचनाम्यादरम्यान काढण्यात आलेले दिशाचे फोटो देखील तपास अधिकाऱ्यांनी पडताळले. ज्यात दिशा जेव्हा पडली तेव्हा ती निर्वस्त्र नव्हती तसेच तिच्या गुप्तांगावर देखील कोणतीही जखम नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. तसेच बाह्यांगावरील जखमांमध्ये देखील कोणतीही झटपट अथवा अन्य संशयित प्रकार घडलेला नसल्याचे समोर आले आहे. यात ज्या २० ते २५ लोकांचा जबाब पोलिसांनी नोंदविला होता त्या सर्वांची पुन्हा पडताळणी परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर हे करत असुन सर्व बाजूने या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
त्यामुळे मृत्यूपूर्वी तिच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या दाव्यात तथ्य नसल्याचे उघड झाले आहे. दिशाच्या मृत्यूचा संबंध बहुचर्चित सुशांतसिंग राजपूत (३४) आत्महत्येशी जोडला जात असुन त्यावरून सर्वत्र हंगामा सुरू आहे. त्यामुळे मालवणी पोलिसांनी हा तपास सुरू ठेवला असुन याप्रकरणात अफवा पसरविणाऱ्यांवरही कायद्याचा बडगा उगारला जाणार असल्याहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.