ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या 'संघर्ष' प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात येणारी दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट महिना उजाडला तर अद्याप राज्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही, दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत यामुळेच यंदा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा संकल्प केल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांची 'संघर्ष' प्रतिष्ठानची ही दहीहंडी मुंबईतील प्रसिद्ध दहीहंड्यांपैकी एक आहे. मात्र दहीहंडीदरम्यान पाण्याची होणारी वारेमाप उधळपट्टी पाहता ती रद्द करून राज्यातील शेतक-यांना विशेषत: राज्यातील माता-भगिनींना मदत करण्याचा आपला संकल्प आहे, असे आव्हाड म्हणाले. आव्हाड यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून त्यांचा आदर्श घेऊन इतर राजकारणीही त्यांची प्रतिष्ठेचा दहीहंडी उत्सव रद्द करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आव्हाड यांची ही भूमिका दुटप्पी असल्याचे सांगत आपण गेल्या वर्षीपासूनच मोठ्या प्रमाणात दहीहंडी साजरी करत नसल्याचे ठाण्यातील 'संस्कृती' प्रतिष्ठानचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आव्हाडांची ही भूमिका कौतुकास्पद असली तरी त्यांनी आपलाच आदर्श घेऊन हा निर्णय घेतल्याचेही सरनाईक म्हणाले. छोट्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरी करून उरलेल्या पैशातूंन आपण गरजूंना मदत केली. आमच्या दहीहंडीदरम्यान पडून जखमी झालेल्या एका मुलीच्या उपचाराचा खर्चही आपण केला, असे सांगत या उपक्रमाचा पाया आपणच रचल्याचे सरनाईक यांनी ठासून सांगितले.