पणत्याही लखलखणार!

By admin | Published: November 6, 2015 03:05 AM2015-11-06T03:05:34+5:302015-11-06T03:05:34+5:30

अष्टदिशांना उजळून टाकणाऱ्या पणत्यांनी आता दिवाळीनिमित्ताने चांगलीच मागणी धरली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पारंपरिक पणत्यांनाही कारागीर डिझायनर लूक

Disho! | पणत्याही लखलखणार!

पणत्याही लखलखणार!

Next

- लीनल गावडे,  मुंबई
अष्टदिशांना उजळून टाकणाऱ्या पणत्यांनी आता दिवाळीनिमित्ताने चांगलीच मागणी धरली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पारंपरिक पणत्यांनाही कारागीर डिझायनर लूक देऊ लागले असून, अशाच डिझायनर पणत्यांची बाजारपेठांत चांगलीच चलती आहे. विशेषत: धारावीतल्या कुंभारवाड्यात डिझायनर पणत्यांची कलाकुसर रंगात आली असून, अशा पणत्यांनी मुंबईकरांना भुरळ घातल्याने आता पणत्याही लखलखणार आहेत.
ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरातील बाजारपेठा हाऊसफुल्ल झाल्या असून, कंदील, पणत्या आणि रांगोळ्यांनी ग्राहकपेठांवर कब्जा केला आहे. दिवाळी आनंदासह प्रकाशानेही उजळून निघावी म्हणून मुंबईकरांनी दिव्यांची माळ लावली नाही तर नवलच. म्हणूनच की काय कुंभारवाड्यातल्या डिझायनर पणत्यांना मुंबईसह देशविदेशातूनही मागणी येऊ लागली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कुंभारवाडा पणत्यांनी सजला आहे. पणत्यांची खरेदी करण्यासाठी कुंभारवाड्यात ग्राहकांची रीघ लागली आहे. येथे स्वस्त दरात उत्तम प्रतीच्या पणत्या मिळत असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पणत्यांना सोनेरी आणि फ्लोरोसंट रंगाने रंगविण्यात आले आहे. पणत्यांमध्ये विविध आकार असून, गोल, पंचकोनी, फुल, कोयरी, स्वस्तिक, मटका, तुळशीवृंदावन यांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे दिव्यावर रंगासोबत लेसही लावण्यात आली आहे. शिवाय कुंदनवर्क केलेल्या पणत्यांचाही यात समावेश आहे. पणत्या साधारणत: २० रुपये अर्धा डझन या दराने येथे विकल्या जात आहेत. समजा जर एकच मोठी पणती पाहिजे असेल; तर लक्ष्मी आणि गणेशाच्या प्रतिकृतीच्या आकाराच्याही पणत्या येथे विक्रीसाठी आहेत. या पणत्या आकाराने मोठ्या असल्याने त्या दोनच पुरेशा होतात, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. या पणत्यांची किंमत ५० रुपयांपासून
सुरू होते.

दरवर्षी ग्राहकांना पणत्यांमध्ये विविधता हवी असते. यंदा वेगवेगळ्या आकारासोबत डिझायनर रंगांना लोक पसंती देत आहेत. लोकांच्या रंगाची पसंती लक्षात घेऊन फ्लोरोसंट प्रकारच्या रंगांचा वापर यंदा आम्ही जास्त केला आहे.
- योगेश टंक, योगेश पॉटरीज, कुंभारवाडा

Web Title: Disho!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.