वाहनचोर टोळी अटकेत

By admin | Published: September 11, 2014 12:48 AM2014-09-11T00:48:36+5:302014-09-11T00:48:36+5:30

भाड्याने लावण्याच्या बहाण्याने मोटारी चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात आर्थिक विभाग गुन्हे शाखेला यश आले.

Dishonor gang detained | वाहनचोर टोळी अटकेत

वाहनचोर टोळी अटकेत

Next

नवी मुंबई : भाड्याने लावण्याच्या बहाण्याने मोटारी चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात आर्थिक विभाग गुन्हे शाखेला यश आले. या टोळीतून पाच जणांना दिल्लीतून अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३१ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
गाड्या भाड्याने लावण्याच्या बहाण्याने देताना त्या चोरीला जाण्याचे प्रकार शहरामध्ये घडत होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेने तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. भाड्याने देण्याकरिता असलेल्या महागड्या गाड्यांवर या टोळीचे लक्ष असायचे. अशा गाडी मालकाच्या परिचयाची व्यक्ती शोधून त्याच्यामार्फत गाड्या भाड्याने घ्यायच्या. त्यानंतर पहिले दोन ते तीन महिने या गाड्यांचे भाडे गाडीमालकाला देऊन त्यांचा विश्वास मिळवायचा. मात्र त्यानंतर मोबाइल नंबर बंद करून गाड्या चोरून ही टोळी फरार व्हायची. अशा प्रकारे गाड्या चोरीला गेल्याच्या नवी मुंबईत ११ घटना घडल्या. अखेर आर्थिक विभाग गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोरे, हवालदार प्रमोद रजपूत, पोलीस नाईक विजय देवरे, अजय मोरे यांचे पथक तयार केले होते. या पथकाने दिल्लीतून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून ३१ गाड्या जप्त केल्या. त्यामध्ये ७ स्कॉर्पिओ, ६ स्विफ्ट डिझायर, २ इंडिगो, २ इंडिका, २ वॅगनआर, १ ह्युंदाय तसेच टाटा मांझा व शेव्हर्ले एन्जॉय या गाड्यांचा समावेश आहे. गाड्या भाड्याने घेताना सदर गाड्यांची मूळ कागदपत्रे देखील ही टोळी मिळवत असे. अशा प्रकारे या टोळीने नवी मुंबई, पुणे, ठाणे येथून गाड्यांची चोरी केली होती. या गाड्या राज्याबाहेर भाड्याने देण्याचे तसेच गहाण ठेवल्या जायच्या असे गुन्हे शाखा पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. याच कागदपत्रांच्या आधारे ते गाड्यांचे मूळ नंबर तसेच ठेवून इतरांसोबत गाडीचा व्यवहार करायचे. या टोळीने चोरीच्या गाड्यांचे मूळ नंबर तसेच ठेवल्याने ही टोळी हाती लागल्याचे मेंगडे यांनी सांगितले. अटक पाच जणांमध्ये दोघे उत्तर प्रदेशचे, एक जण पुण्याचा तर दोघे ठाण्यातील आहेत. हे सर्वजण यापूर्वी वाहन चालकाचे काम करायचे. त्यांच्याकडून जप्त वाहनांमध्ये ११ गाड्या नवी मुंबई हद्दीतून चोरीला गेल्या होत्या. तर २० गाड्या त्यांनी नवी मुंबईबाहेरुन चोरलेल्या होत्या. वाहन चोरी प्रकरणी प्रथमच मोठ्या प्रमाणात ही कारवाई झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Dishonor gang detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.