नवी मुंबई : महावितरणच्या सानपाडा सेक्टर - ३० मधील ट्रान्सफॉर्मर शेडची धर्मशाळा झाली आहे. अनेक महिन्यांपासून या ठिकाणी बेघरांनी मुक्काम ठोकला आहे. येथे अवैध गोष्टीही होऊ लागल्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सानपाडा रेल्वे स्टेशन ते दत्त मंदिरकडे जाणाऱ्या रोडवर भय्यासाहेब बोंगिरवार भवनला लागून महावितरणचे ट्रान्सफॉर्मर शेड आहे. सदर शेडचा दरवाजा एक वर्षापूर्वीच तुटला आहे. दरवाजा नसल्यामुळे सदर ठिकाणी बेघरांनी आश्रय घेतला आहे. सायंकाळी या ठिकाणी अनेक जण मुक्कामाला येऊ लागले आहेत. उच्च विद्युत दाबाचे ट्रान्सफॉर्मर असलेल्या ठिकाणी मद्यपान सुरू असते. अनेकवेळा भांडणे होत असतात. विजेचा धक्का बसून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही महिन्यांपासून सदर ठिकाणी अनैतिक व्यवसाय होऊ लागले आहेत. भविष्यात शक्ती मिलसारखा प्रकार या ठिकाणी होण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. महावितरणचे कर्मचारी या अतिक्रमणाकडे वारंवार दुर्लक्ष करू लागले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांचेच येथे राहणाऱ्यांना अभय आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सदर शेडला दरवाजा लावून येथील गैरप्रकार थांबवावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर शेडची झाली धर्मशाळा
By admin | Published: May 03, 2015 5:33 AM