कुलदीप घायवट
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी निर्जंतुकीकरण (सॅनिटायझर) फवारणी यंत्र बसविण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने 'सॅनिटायझर टनेल' आणि एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी 'निर्जंतुकीकरण वाहन' तयार केले. मात्र शरीरावर अल्कोहोल, क्लोरीन, लायझॉल याचा फवारा मारल्याने आरोग्याला अपाय होऊ शकतो, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले. अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सॅनिटायझर फवारणी केली जाते. मात्र यामुळे कर्मचाऱ्यांना त्वचा रोग, घसा खवखवणे असे दुष्परिणाम होऊ शकतात.
सार्वजनिक ठिकाणी सोडीयम हायपोक्लोराईटची फवारणी, सॅनिटायझर टनेल उभे केले आहेत. मात्र अशा प्रकारची फवारणी करून कोरोनाला अटकाव करणे कठीण आहे. कोरोना हवेतून दूरवर पसरत नाही. तो ८ मीटर हवेत उडून नंतर खाली बसतो. म्हणून हवेत फवारणीचा उपयोग नाही. संसर्गाचा सगळ्यात मोठा धोका हा कोरोना बाधित व्यक्तीशी संपर्क येऊन त्याच्या खोकण्या, शिंकण्यातून आहे. त्याने हात लावला त्याचठिकाणी हात लावण्यातून आहे. फक्त निर्जंततूकीकरण कक्षातून जाऊन हा धोका टळणार नाही. साबणाने वारंवार हात धुवणे आवश्यक आहे, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितले.
.............................................
डोळे, त्वचा, नाक चुरचुरणे अपाय होण्याची भीती
सॅनिटायझर फवारणी संपूर्ण अंगावर घेणे असुरक्षित आहे. यामुळे घसा खवखवणे, डोळे, त्वचा, नाक चुरचुरणे असे अपाय होऊ शकतात. वारंवार हात धुवणे, मास्क घालणे असे करणे योग्य आहे.
- डॉ. मनोज मस्के, श्वसनविकार तज्ज्ञ
रेल्वे प्रशासनाने सॅनिटायझर टनेल उभे केले होते. मात्र सॅनिटायझर टनेलमुळे अपाय होऊ शकतो, असे आरोग्य विभागाकडून माहिती मिळताच सॅनिटायझर टनेल त्वरित बंद करण्यात आले.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
यासंदर्भात काही माहिती नाही. स्थानिक पातळीवर काही ठिकाणी निर्जंतुकीकरण वाहन उभारलेत, असे समजले आहे. फार मोठ्या प्रमाणात याची उभारणी केली नाही. कुठे वापरायचे हे काही ठरले नाही. त्यामुळे निर्जंतुकीकरण वाहन बंद करायचे कि सुरु ठेवायचे हा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येईल.
- शेखर चन्ने, प्रभारी व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ