मुंबई - आधुनिक यंत्रसामग्रीचा समावेश असलेल्या व्यायामशाळांमध्ये स्टिरॉईड्स तसेच अवैध औषधांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाने व्यायामशाळा विरोधातील कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेंतर्गत मुंबईसाठी पाच पथके तयार करण्यात आली असून, या पथकांनी उपनगरातील २५ व्यायामशाळांची तपासणी केली. यावेळी दोन ठिकाणाहून प्रोटीन पावडर जप्त करण्यात आली असून, ही विशेष मोहीम पुढेदेखील चालू राहणार आहे.
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, एफडीएकडे दोन ते तीन तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीची दखल घेत मुंबई विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. अन्न आणि औषध विभागाकडून ही मोहीम संयुक्तरीत्या चालविण्यात येत असून, पुढचे काही दिवस ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती एफडीएचे सहायक आयुक्त मुख्यालय डी. आर. गहाणे यांनी दिली आहे. वांद्रे ते अंधेरी या पट्ट्यातील व्यायामशाळांच्या तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. दिवसभरात २५ व्यायामशाळांची तपासणी करण्यात आली असून, प्रोटीन पावडरच्या व्यतिरिक्त अन्य काही न सापडल्याची माहिती गहाणे यांनी दिली. दोन ठिकाणाहून प्रोटीन पावडर जप्त करण्यात आली असून, याचा एक नमुना तपासणीसाठी घेण्यात आला असून, मुंबईतील सर्वच व्यायामशाळांची तपासणी करण्यात येणार असल्याचे संकतेही देण्यात आले आहे.