मुंबई - तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारवर टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’चे मोठे स्फोट होत आहेत. यासंदर्भात रविवारी रात्री दिल्लीतील 6 जनपथ येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांच बैठक झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही बैठकीला हजर होते. तर, संजय राऊत यांच्याशीही चर्चा झाली आहे. मात्र, या लेटरबॉम्बमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. तसेच, विरोधकांना परमबीर सिंग आता प्रिय वाटू लागल्याचेही ते सामनातून म्हटलंय. राऊत यांनी केंद्र सरकारवरही टीका केलीय.
विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, त्यासोबतच राज्य सरकार बरखास्त करण्याचीही मागणी भाजपा नेते करत आहेत. याबाबत, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची भाषा करणाऱ्यांनाही त्यांनी चांगलंच सुनावलं आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यानंतर, संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपा नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय एजन्सींचा हस्तक्षेप राज्य सरकारमध्ये वाढला असून राज्याच्या अधिकारावर घाला घालणाऱ्या केंद्र सरकारलाच बरखास्त करा, अशी मागणी राऊत यांनी केलीय.
अनिल देशमुख यांचं काय होणार हा महाराष्ट्रासमोरील महत्त्वाचा प्रश्न नसून फडणवीसांच्या प्रत्येक आरोपाला महत्त्व देण्याची गरज नसल्याचे राऊत यांनी म्हटले. केंद्रीय तपास यंत्रणांना आम्ही संपूर्णपणे सहकार्य करत आहोत, तरीही राज्यांच्या अधिकारांवर घाला घालण्याचं काम केंद्र सरकारकडून होत आहे. त्यामुळे, केंद्र सरकारच बरखास्त करावे, असे राऊत म्हणाले.
2 कावळे मेले तरी राज्यात सीबीआय येईल.
एका बाजूला राज्यपाल राजभवनात बसून वेगळेच उपद्व्याप करीत आहेत तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबावाचा खेळ करीत आहे. कुठे एखाद्या भागात चार कोंबडय़ा व दोन कावळे विजेच्या तारांचा शॉक लागून मेले तरी केंद्र सरकार महाराष्ट्रात सीबीआय किंवा एनआयएला पाठवू शकेल असे एकंदरीत दिसते. महाराष्ट्राच्या संदर्भात कायदा-सुव्यवस्था वगैरे ठीक नसल्याचा ठपका ठेवायचा व राष्ट्रपती राजवटीचा हातोडा हाणायचा हेच महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे अंतिम ध्येय दिसते व त्यासाठी नवी प्यादी निर्माण केली जात आहेत. परमबीर सिंग यांचा वापर याच पद्धतीने केला जात आहे हे आता स्पष्ट दिसते, असे सामनातून शिवसेनेनं म्हटलंय.
बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जो आरोपांचा धुरळा उडवला आहे, त्यामुळे गृहखात्याची प्रतिमा नक्कीच मलिन झाली आहे. हा सरकारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे व विरोधी पक्षाच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. परमबीर सिंग यांच्या निलंबनाची मागणी कालपर्यंत महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करीत होता. आज परमबीर हे विरोधकांची 'डार्लिंग' झाले आहेत व परमबीर सिंग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर निशाणा साधीत आहेत, असे शिवसेनेनं म्हटलंय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपला सल्ला देण्यात आलाय. महाविकास आघाडी सरकारजवळ आजही चांगले बहुमत आहे. बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल. हा इशारा नसून वस्तुस्थिती आहे. एखाद्या अधिकाऱ्यामुळे सरकारे येत नाहीत व कोसळत नाहीत, हे विरोधकांनी विसरू नये!, असेही संपादकांनी सांगितलंय.