आता होणार चित्रपट इतिहासाचा उलगडा
By Admin | Published: January 10, 2017 05:29 AM2017-01-10T05:29:04+5:302017-01-10T05:29:04+5:30
मुंबईतील फिल्म्स डिव्हिजन प्रांगणातील भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयाचे लवकरच उद्घाटन होणार आहे. याकरिता संग्रहालयाच्या सल्लागार
मुंबई : मुंबईतील फिल्म्स डिव्हिजन प्रांगणातील भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयाचे लवकरच उद्घाटन होणार आहे. याकरिता संग्रहालयाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष ख्यातनाम चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांनी चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी भारतीय चित्रपट क्षेत्राच्या शतकापासून प्रवास दर्शवणाऱ्या दुर्मीळ प्राचीन आणि अन्य संस्मरणीय वस्तू राष्ट्रीय संग्रहालयासाठी देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसमोर आता चित्रपटांच्या इतिहासाचा उलगडा होणार आहे.
संग्रहालय सल्लागार समितीची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीत संग्रहालयाच्या दुसऱ्या टप्प्यात संकल्पनेवर आधारित रचनेलाही मंजुरी देण्यात आली. सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत कोलकात्यातील नॅशनल कौन्सिल आॅफ सायन्स म्युझियम या संग्रहालयाचे काम पहात आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल या बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. भारतीय सिनेमाच्या विविध पैलूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी सरकार एनएमआयसीला अतिशय महत्त्व देत असल्याचे मित्तल यांनी या वेळी सांगितले.
या संग्रहालयाला दिलेली भेट हा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, यामध्ये अनेक संवादात्मक चर्चा सत्राचे आयोजन, दुर्मीळ ध्वनिमुद्र्रण ऐकण्याची सोय, काही क्षणचित्र पाहण्याची सुविधा, तसेच जुन्या काळातील चित्रपट निर्मिती आदी गोष्टींचा अनुभव घेता येईल. ज्येष्ठ चित्रपट निर्माते अदुर गोपाळकृष्णन आणि कृष्णा स्वामी, नामांकित सिनेमेटाग्रॉफर ए. के. बीर, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे माजी संचालक सुरेश छाब्रिया, चित्रपट संग्राहक शिवेंद्र डुंगरपूर, चित्रपट समीक्षक संजीत नार्वेकर, एनसीएसएमचे महासंचालक अनिल मानेकर आणि छत्रपती शिवाजी वास्तुसंग्रहालयाचे महासंचालक सब्यासाची मुखर्जी, चित्रपट क्युरेटर अमरीत गांगर या बैठकीत उपस्थित आहे. (प्रतिनिधी)