Join us

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 8:32 PM

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी असा अरुण कदम यांचा राजकीय प्रवास राहिला असून त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या नगरसेविका राहिल्या आहेत.

शिवसेनेचे मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम यांनी गतवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. स्थानिक नागरी समस्यांवर आवाज उठवण्याची जबाबदारी न मिळाल्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगत कदम यांनी सेनेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांवर निशाणाही साधला होता. शिवसेनेचे मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख पद न मिळाल्याने कदम नाराज होते. मात्र, राष्ट्रवादीने ही त्यांची इच्छा पूर्ण केली. पण, आता अरुण कदम यांची त्या पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत, स्वत: जितेंद्र आव्हाड यांनीच ट्विट करुन माहिती दिली.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी असा अरुण कदम यांचा राजकीय प्रवास राहिला असून त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या नगरसेविका राहिल्या आहेत. मीरा भाईंदर मध्ये एकाकाळी सत्तेत असणारी तसेच खासदार, आमदार देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची शहरात वाताहत झाली आहे. स्थानिक पातळीवर जनतेसह राजकारण व प्रशासनावर प्रभाव टाकु असेल असा चेहरा व नेतृत्व राष्ट्रवादीत नाही. मात्र, कदम यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला बळ मिळालं होतं. मात्र, गेल्या ८ महिन्यात बदलेलं राजकारण आणि शिवसेनेत पडलेले दोन गट, यामुळे कदम यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी नाराज आहे. त्यातूनच, त्यांच्याकडून हे पदा काढून घेण्यात आलं आहे. आता, मिरा भाईंदर शहर (जिल्हा) च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे. 

मिरा भाईंदर शहर (जिल्हा) च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी असलेले  अरुण कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येतं असून त्यांच्या निष्क्रिय कारभारामुळे पक्षावर परिणाम होतं आहे. तसेच इतर पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे असलेले संबंध हे पक्षवाढीसाठी आड येतं आहेत, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावरील कारवाईचं राजकारण सांगितलं. तसेच, पक्षाने आता मोहन पाटील यांना जिल्हाध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहितीही आव्हाड यांनी दिली. या निवडीचे पत्रही त्यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहे.  

टॅग्स :जितेंद्र आव्हाडमीरा-भाईंदरठाणेराष्ट्रवादी काँग्रेस