झारखंडच्या तरुणीची व्यथा; १० लाखांची मागणी, मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या चंदेरी दुनियेत अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन झारखंडच्या तरुणीनेही धाव घेतली. कामाच्या शोधात ती या पॉर्न फिल्म प्रोडक्शनची शिकार ठरली. तिने पॉर्न शूटला नकार दिला म्हणून तिच्याकडे १० लाख रुपयांची मागणी करत पोलिसांत नेण्याची धमकी दिली. अखेर, तिला एनर्जी ड्रिंकमधून गुंगीचे औषध देत शूट करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार तरुणीच्या तक्रारीतून समोर आला. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात रोवा खान ऊर्फ यास्मीन खानविरुद्ध स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मूळची झारखंडची रहिवासी असलेल्या १९ वर्षीय रेश्माने (नावात बदल) मुंबईत आल्यानंतर अभिनेत्री गहना वशिष्ठसोबत एका वेबसीरिजमध्ये काम केले. त्यानंतर २९ डिसेंबर रोजी संतोष नावाच्या व्यक्तीने कॉल करून एका वेबसीरिजमध्ये काम असल्याचे संबंधित सीरीज फक्त ‘हॉटहिटमूव्हिज’ या ॲपवर प्रसारित होणार असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे तिला ३० डिसेंबर रोजी मढ येथील ग्रीन पार्क बंगला येथे बोलावण्यात आले. त्यानंतर लोणावळा येथील शूटिंग रद्द झाल्याचे सांगून, येथेच शूटिंग होणार असल्याचे सांगितले. आलिशा म्हणजे रोवाने करारावर सही करून घेतली. तो इंग्रजीत असल्याने तिला हिंदीत वाचून दाखवला. त्यात न्यूड सीनचा उल्लेख नव्हता.
पहिला सीन मुलीसोबत पार पडला. दुसऱ्या सीनमध्ये मुलासोबत बेड सीन करण्यास सांगितले. तिने नकार देताच, १० लाख रुपये भरावे लागतील अन्यथा पोलिसांत तक्रार देण्याची धमकी दिली. अखेर काही वेळाने एनर्जी ड्रिंक दिले. त्यातच गुंगीचे औषध देऊन बेड सीन करून घेतल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे.
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ३० हजार रुपये खात्यात पाठवले. त्यानंतर तरुणी गावी निघून गेली. सारे काही व्यवस्थित सुरू असताना २८ जानेवारीला तिचे पॉर्न व्हिडीओ शेअर होत असल्याचे समजले.
तिने लिंक पाहताच तो व्हिडीओ ग्रीन पार्क येथील असल्याचे समजले. तिने याबाबत यास्मीनकडे चौकशी केली तेव्हा, तू काम केले ते प्रसारित होणारच होते, असे सांगून तिने फोन कट केला. त्यानंतर फोन घेणे बंद केले. त्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी मुंबई गाठून घडलेला प्रकार वकिलाला सांगून सोमवारी मालवणी पोलिसात तक्रार दिली.
* लढा देणार, आराेपींना शिक्षा झालीच पाहिजे
या व्हिडीओबाबत आईवडिलांना समजताच त्यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली. गावात जगणे मुश्किल झाले. मुंबई पोलिसांकडून सहकार्य मिळत आहे. माझ्यासोबत झाले ते अन्य मुलींसोबत नको म्हणून मी याविरोधात लढा देणार आहे. आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे.
- तक्रारदार तरुणी
......................