Join us

भांडुपमध्ये क्रिकेट मॅच खेळताना हाणामारी

By admin | Published: October 29, 2016 3:57 AM

क्रिकेटचे सामने सुरू असताना भांडुपमधील तरुणांनी विक्रोळीतील तीन तरुणांना बॅट आणि स्टम्पच्या साहाय्याने जबर मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

मुंबई : क्रिकेटचे सामने सुरू असताना भांडुपमधील तरुणांनी विक्रोळीतील तीन तरुणांना बॅट आणि स्टम्पच्या साहाय्याने जबर मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. हल्ल्यामध्ये चार तरुण गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.भांडुप पश्चिमेकडील मुलुंड-गोरेगाव लिंक रोडलगत असलेल्या छोट्या मैदानात गोदावरी पाटील क्रीडा मंडळातर्फे २० वर्षांखालील अंडरआर्म क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. सामन्याची सेमी फायनल मॅच सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरू झाली. या वेळी फिल्डिंग करत असलेल्या विक्रोळी बॉईज संघातील बॉलर जैद खान याचा एक बॉल अम्पायर करीम खान यांनी वाइड घोषित केला. वाइड बॉल नसल्याचे लक्षात येताच विक्रोळी संघातील शम्स तरबेज खान याने अम्पायर खान यांच्याकडे याबाबत विचारणा केली. यावरून वाद पेटला. खान यांनी शम्सला बाहेरचा रस्ता दाखवत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या बचावासाठी धावलेल्या जैद खान याच्या डोक्यामध्ये तन्वीर खान याने बॅट घातली.रस्तबंबाळ होऊन जैद जमिनीवर कोसळला. त्याला वाचविण्यासाठी धावलेल्या सुरज साहू आणि रकीब यांनाही तन्वीर, करीम आणि रोहित यांनी मारहाण केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. याची माहिती मिळताच पोहोचलेल्या भांडुप पोलिसांनी जखमींना मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करून या प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.