सुटका केलेल्या अल्पवयीन मुलींची पुन्हा कुंटणखान्यात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 06:47 AM2019-07-08T06:47:11+5:302019-07-08T06:47:21+5:30

निवृत्त पोलीस निरीक्षकाची पैशांसाठी विकृती : औरंगाबाद येथून १४ वर्षांनी झाली अटक

Displaced juvenile girls again in prostitution | सुटका केलेल्या अल्पवयीन मुलींची पुन्हा कुंटणखान्यात रवानगी

सुटका केलेल्या अल्पवयीन मुलींची पुन्हा कुंटणखान्यात रवानगी

googlenewsNext

मुंबई : समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून नागपाडा येथील कामाठीपुरा परिसरातून तीन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली होती. मात्र, पैशांसाठी नागपाडा पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने त्या मुलींची पुन्हा कुंटणखाण्यातच रवानगी केल्याची धक्कादायक माहिती १४ वर्षांनी उघडकीस आली. या प्रकरणात निवृत्त पोलीस निरीक्षक कलंदर शेख (६८) याला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली आहे. तर त्याच्या साथीदार रवींद्र पांडेला कामाठीपुरा येथून बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.


नागपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००४ मध्ये कामाठीपुरा येथून १३ ते १४ वर्षांच्या तीन मुलींची समाजसेवा संस्थेच्या माहितीद्वारे शेखच्या नेतृत्वाखालील पथकाने सुटका केली होती. तेव्हा शेखने या मुलींची रवानगी बालसुधार गृहात करणे गरजेचे होते. मात्र, शेखने या मुलींना कामाठीपुरातील दलाल रवींद्र पांडे (६०)च्या मदतीने कुंटणखाना चालविणाऱ्या मीरा तमंग या महिलेच्या हवाली केले. २००५ पासून त्या मुली महिला दलालाकडेच वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती संस्थेला मिळाली. त्यांनी याबाबत पोलीस आयुक्तांना कळविले. त्यानुसार, समाजसेवा शाखेने सापळा रचून त्या मुलींची तेथून सुटका केली. तपासात, एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या मदतीने त्यांना पुन्हा तेथे नेण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, काहीही हाती लागले नाही.


अखेर, नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बागवे यांनी या तपासाला सुरुवात करत, त्याच्या मुळाशी गेले. या
तिघींपैकी एका मुलीच्या चौकशीत कलंदर शेखचा सहभाग उघड झाला. पांडे याला यात कमिशन मिळत होते. यात किती रुपयांसाठी या मुलींना पुन्हा वेश्याव्यवसायत ढकलण्यात आले? याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती नागपाडा पोलिसांनी दिली. यातील सहभाग समोर येताच, निवृत्तीनंतर औरंगाबादला स्थायिक झालेल्या शेखला तेथून अटक करण्यात आली, तर कामाठीपुरामधून पांडेलाही बेड्या ठोकण्यात आल्या. दोघांनाही न्यायालयाने १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती बागवे यांनी दिली आहे.

अन्य अधिकारीही चौकशीच्या घेºयात
या प्रकरणात तत्कालीन तपास अधिकाऱ्यांकडेही चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते. शेखच्या चौकशीतून या प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. कुंटणखाना चालविणाºया तमंग या महिलेचा मृत्यू झाल्याचीही माहिती समजते आहे.

यामुळे तपासात अडथळे
या प्रकरणी समाजसेवा संस्थेकडून वेळोवेळी पाठपुरावा सुरू होता. मात्र, नागपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी बदलायचे तसा तपासही थंडावत होता. अनेक तपास अधिकारी आले आणि गेले. मात्र, तपास तेथेच राहिला.

Web Title: Displaced juvenile girls again in prostitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.