बेस्ट महाव्यवस्थापकांविरोधात नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:27 AM2018-05-18T02:27:00+5:302018-05-18T02:27:00+5:30
आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोतही अडचणीत आहेत. तिकीट प्रणालीतील इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये बिघाडामुळे बेस्टचे मोठे नुकसान होत आहे.
मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोतही अडचणीत आहेत. तिकीट प्रणालीतील इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये बिघाडामुळे बेस्टचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना सदस्यांनी गुरुवारी बेस्ट समितीच्या बैठकीत केला. विरोधी पक्षाने त्याचे समर्थन करीत बागडेंविरोधात अविश्वास ठराव आणण्याचे आव्हान दिले.
बेस्टच्या बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्रायमॅक्स मशीनद्वारे तिकीट देण्यात येते. मात्र या मशीनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने बेस्ट वाहकांची डोकेदुखी वाढली आहे. अनेक वेळा ई-तिकीट न निघाल्यामुळे फुकट्या प्रवाशांचे फावते आहे. त्यामुळे प्रशासनाने जुन्या पद्धतीप्रमाणे तिकीट देण्याचा पर्याय निवडला. मात्र यावर बेस्ट समितीच्या बैठकीत शिवसेनेचे सदस्य सुहास सामंत यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत महाव्यवस्थापकांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
हीच संधी साधत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महाव्यवस्थापकांविरोधात अविश्वास ठराव आणण्याचे आव्हान शिवसेनेला दिले. मात्र अविश्वास ठराव आणल्यास पाठिंबा देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. बसगाड्यांचा ताफा आणि प्रवासी संख्या कमी होत आहे. त्यातच ट्रायमॅक्स मशीनमुळेही नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे शिवसेनेने महाव्यवस्थापकांना राज्य सरकारकडे परत पाठवावे, अशी सूचना काँग्रेसने केली आहे.
...तर कठोर
निर्णय घ्यावा लागेल
बेस्ट समितीच्या बैठकीत ट्रायमॅक्सचा मुद्दा वारंवार येत आहे. प्रशासनाने या वेळेस या गंभीर मुद्द्यावर तोडगा न काढता आपल्या मतांवर ठाम राहिल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराच बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी या वेळी दिला.
महाव्यस्थापक
परदेश दौºयावर
बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे हे सध्या काही कामानिमित्त परदेशात आहेत. त्यामुळे गुरुवारी झालेल्या बैठकीत बागडे यांच्याऐवजी उपमहाव्यवस्थापक आर.जे. सिंग यांनी उपस्थिती लावली. बागडे हे २२ मे रोजी मुंबईत परतणार आहेत.
बेस्ट समित्यांच्या अधिकारावर गदा
नवीन तिकीट मशीनबाबत एक उपसमिती नेमण्यात आली होती. या समितीने बेस्ट उपक्रमाला दिलेला अहवाल महाव्यवस्थापकांना मान्य नाही. बेस्ट समितीच्या अधिकारांवरच गदा आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेनेचे अनिल कोकीळ यांनी केला.
किंगलाँग
बसगाड्या भंगारात
बेस्ट उपक्रमाने २६४ किंगलाँग बसगाड्या खरेदी केल्या होत्या. मात्र या बसगाड्यांमुळे नफा होण्याऐवजी तोटा होऊ लागला. बसेस नादुरुस्त होऊ लागल्या तर काही बसचे आयुर्मान संपुष्टात आल्याने या बसगाड्या भंगारात काढण्यात आल्या आहेत.
>यासाठी महाव्यवस्थापकांवर रोष
ट्रायमॅक्स मशीनला चार्ज करण्यासाठी काही आगारांमध्ये चार्जर नाहीत. त्यामुळे या मशीन बंदच असून बेस्टचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. ट्रायमॅक्स मशीन वापरण्यायोग्य नसतानाही महाव्यवस्थापकांच्या हट्टीपणामुळे या मशीनचा वापर सुरूच ठेवावा लागत आहे. अशा महाव्यवस्थापकांना राज्य सरकारच्या सेवेत पाठविण्याची मागणी शिवसेनेचे सुहास सामंत यांनी केली.