मध्य रेल्वेविरोधात नाराजी

By admin | Published: October 16, 2015 02:41 AM2015-10-16T02:41:21+5:302015-10-16T02:41:21+5:30

उपनगरीय मार्गावर रखडलेले प्रकल्प, प्रवाशांच्या मागण्या आणि समस्या सोडवण्यात मध्य रेल्वेकडून कोणताही पुढाकार घेण्यात येत नसल्याचा आरोप करत नाराजीचा सूर खासदारांसह प्रवासी संघटनांमधून उमटला आहे

Displeasure against Central Railway | मध्य रेल्वेविरोधात नाराजी

मध्य रेल्वेविरोधात नाराजी

Next

मुंबई : उपनगरीय मार्गावर रखडलेले प्रकल्प, प्रवाशांच्या मागण्या आणि समस्या सोडवण्यात मध्य रेल्वेकडून कोणताही पुढाकार घेण्यात येत नसल्याचा आरोप करत नाराजीचा सूर खासदारांसह प्रवासी संघटनांमधून उमटला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसटी येथील मुख्यालयात प्रकल्प आणि प्रवाशांच्या मागण्यांसंदर्भात खासदारांसोबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला २५ खासदारांपैकी सात खासदारच उपस्थित होते. उपस्थित सात खासदारांनी न होणाऱ्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली.
मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थित सात खासदारांमध्ये भाजपाचे खासदार किरीट सोमय्या आणि कपिल पाटील, शिवसेनेचे अरविंद सावंत, राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजिद मेनन व नामनिर्देशित खासदार भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते. तसेच मध्य रेल्वेकडून महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांच्यासह इंजिनीअरिंग व बांधकाम विभागातील अनेक अधिकारी होते. या वेळी सोमय्या यांनी प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यावर भर देण्यात यावा आणि हे काम वेळेत संपवण्याबाबत सूचना केल्या. तसेच रेल्वे स्थानकातील पार्किंग परिसरात अनधिकृत स्टॉल्स आणि बांधकाम मोठ्या प्रमाणात उभे राहिले असून त्याकडे रेल्वेचे दुर्लक्ष होत असल्याची टीका केली. याविरोधात कठोर पाऊल उचलण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. खासदार कपिल पाटील यांनी भिवंडी स्थानक हे उपनगरीय रेल्वेला जोडण्याची मागणी करत मध्य रेल्वे या मागणीकडे दुर्लक्षच करत असल्याचे सांगितले. ही मागणी अनेक वर्षे केली जात असतानाही मध्य रेल्वेचे या मागणीकडे का दुर्लक्ष होत आहे हेच समजत नसल्याचे ते म्हणाले. फक्त प्रक्रिया सुुरू असल्याची माहिती वारंवार त्यांच्याकडून देण्यात येत होती. पण ठोस निर्णय काहीच होताना दिसत नव्हते, असे लोकमतशी बोलताना ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माजिद मेनन यांनी हार्बरवरील रखडलेला बारा डबा प्रकल्प त्वरित मार्गी लावण्याची सूचना केली आणि हार्बरवरील सर्व स्थानकांचा विकास करण्यात यावा, अशी मागणीही केली. या बैठकीला सात खासदार सोडता भाजपाचे पीयूष गोयल, पूनम महाजन, गोपाळ शेट्टी, शिवसेनेचे अनिल देसाई, संजय राऊत, गजानन कीर्तिकर, अनंत गिते, राजन विचारे, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, काँग्रेसचे राजीव शुक्ला, हुसेन दलवाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डी.पी. त्रिपाठी हे अनुपस्थित होते.
या वेळी उपनगरीय प्रवासी महासंघाचे अनेक पदाधिकारी बैठक होत असलेल्या हॉलबाहेर ताटकळत उभे होते. खासदारांसोबत होत असलेल्या कोणत्याही बैठकीला प्रवासी संघटनांना उपस्थित राहण्यासाठी रेल्वेकडून आमंत्रण दिले जात नसल्याने त्याचा निषेध प्रवासी महासंघाकडून करण्यात आला. उपनगरीय प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी तर अशा बैठकांमध्ये प्रवासी संघटनांनाही निमंत्रण देण्यात यावे, अशी मागणी केली.
प्रवाशांची फक्त आश्वासनांवरच बोळवण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ठाणे आणि त्यापुढील येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल गाड्यांना होणारी गर्दी वाढली असून त्यावर कोणतेही नियंत्रण रेल्वेकडून ठेवता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रवासी महांसघाच्या उपाध्यक्षा लता अरगडे यांनीही महिला प्रवाशांच्या समस्या सोडवण्यात रेल्वेला अपयश येत असल्याची टीका केली. महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर तोडगा काढण्यात रेल्वे असमर्थ ठरली आहे. फारच कमी आरक्षित असणारे डबे यामुळे प्रवास फारच कठीण झाल्याचे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Displeasure against Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.