मुंबई : सरकारच्या कामकाजाबाबत आमची कसलीही नाराजी नसून महाविकास आघाडी भक्कम आहे. पाच वर्ष हे सरकार चांगले काम करेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.काँग्रेस नेते थोरात यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी गुरुवारी भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले, नाराजीचा विषय नव्हता. काही विषय समोरासमोर बसून चर्चा करण्याचे असतात. मोठ्या बैठकांमध्ये अशी चर्चा होऊ शकत नाही. आज झालेली चर्चा सकारात्मक होती, काही विषय प्रशासकीय होते. कोरोनाच्या संकट काळात गरीब माणूस अडचणीत आला आहे, त्याला कशी मदत करता येईल याबाबत बैठकीत व्यवस्थित चर्चा झाल्याचे थोरात म्हणाले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी न्याय योजना देशासाठी मांडली आहे. त्याच्या अंमलबजावणीवरही बैठकीत चर्चा झाली. कोकणात फळबागांचे झालेले नुकसान, यावरही चर्चा झाली. विकास निधीचे वाटप समान व्हायला हवे, म्हणजे कोणा मध्येच नाराजी राहत नाही त्या अनुषंगाने ही चर्चा झाली. विधान परिषदेच्या जागांचे समान वाटप व्हावे, हेही ठरलेले आहे. बैठकीत कोणत्याही अधिकाऱ्यांच्या विषयी चर्चा झालेली नाही, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले, की चर्चा सकारात्मक झाली. मुख्यमंत्र्यांची काम करण्याची एक पद्धती आहे. त्यानुसार ते योग्य निर्णय घेतील, याविषयी आम्हाला खात्री आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काँग्रेसची नाराजी दूर; महाविकास आघाडी भक्कम असल्याचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 2:16 AM