शपथविधीला निमंत्रण नसल्याने मनसेमध्ये नाराजी, राज ठाकरेंनी उद्या बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 08:25 AM2024-06-12T08:25:24+5:302024-06-12T08:25:46+5:30
MNS News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ७२ केंद्रीय मंत्र्यांचा शपथविधीही पार पडला. मात्र या शपथविधीला महायुतीचा घटकपक्ष असूनही मनसे अध्यक्षांना त्याचे निमंत्रण देण्यात आले नाही. यामुळे मनसेमध्ये नाराजी असून पुढील दिशा ठरविण्यासाठी राज यांनी गुरुवारी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शविला. देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ७२ केंद्रीय मंत्र्यांचा शपथविधीही पार पडला. मात्र या शपथविधीला महायुतीचा घटकपक्ष असूनही मनसे अध्यक्षांना त्याचे निमंत्रण देण्यात आले नाही. यामुळे मनसेमध्ये नाराजी असून पुढील दिशा ठरविण्यासाठी राज यांनी गुरुवारी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
शपथविधीचे निमंत्रण का देण्यात आले नाही याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, राज ठाकरे यांना शपथविधीसाठी निमंत्रण आले होते की नाही, याबद्दल मला नीट माहिती नाही. याबाबत राज ठाकरेच सांगू शकतील. भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मला फोन आला होता. मी त्यांच्याशी बोललो, पण राज ठाकरे यांना वैयक्तिकरीत्या फोन केला असेल तर त्याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले.
घाईघाईत विसर पडला असेल : मुनगंटीवार
- मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बाळा नांदगावकर यांच्याशी चर्चा झाली. ते म्हणाले आम्हाला निमंत्रण आलेले नाही. हे वरिष्ठांच्या कानावर घालेन.
- घाई-गर्दीमध्ये विसरले असतील, यात दुसरे काही कारण वाटत नाही. केंद्रीय पक्षाने याची नोंद घ्यायला हवी. आपल्याला जेव्हा एखादा मित्र मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा असे होऊ नये.
शिंदेसेनेचे नेते ‘शिवतीर्थ’वर
भाजपसाठी मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांची उमेदवारी मागे घेतली. दुसरीकडे शिंदेसेनेचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, ठाण्याचे नवनिर्वाचित खा. नरेश म्हस्के, मुंबई पदवीधरचे उमेदवार
डॉ. दीपक सावंत हेहि शिवतीर्थावर दाखल झाले. महायुतीकडून
डॉ. सावंत यांची उमेदवारी अंतिम झाली की राज ठाकरे पाठिंबा देणार असल्याचे समजते.