मनोहर कुंभेजकर मुंबई : वर्सोवा बीचवर रोज जमा होणा-या कच-याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आॅक्टोबर २०१५ पासून शनिवार आणि रविवार असे ९८ आठवडे वर्सोवा रेसिडेन्ट व्हॉलेंटियर्स (व्हीआरव्ही)च्या वतीने स्वच्छतेची मोहीम राबवण्यात येते. यादरम्यान ७ लाख किलो कचरा गोळा करण्यात आला आहे. या संस्थेचे जनक अॅड. अफरोज शाह आणि त्यांच्या सहकाºयांचे अनुकरण केल्यास मुंबईची तुंबापुरी होणार नाही, असे ठाम मत या मोहिमेत सुरुवातीपासून सहभागी असलेल्या वर्सोवा कोळीवाड्यातील राजहंस टपके आणि प्रवीण भावे यांनी व्यक्त केले आहे.मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, मार्वे आणि गोराई या मुंबईची शान असलेल्या प्रमुख ६ चौपाट्या कचराकुंड्या झाल्या असून त्यांची वाईट अवस्था झाली आहे. पालिका प्रशासन जरी या चौपाट्यांच्या स्वछतेवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करत असले तरी या चौपाट्या लोकसहभाग आणि श्रमदानातून चांगल्या प्रकारे चकाचक होतात हे वर्सोवा चौपाटीच्या माध्यमातून गेले ९८ आठवडे दर शनिवार आणि रविवारी आपल्या स्वच्छता मोहिमेद्वारे वर्सोवा रेसिडेन्ट व्हॉलेंटियर्सने (व्हीआरव्ही) व वेसावे कोळी जमात ट्रस्टने दाखवून दिले आहे. येत्या शनिवार आणि रविवारी वर्सोवा बीच स्वच्छतेचा ९९ वा आठवडा आहे. तर येत्या १६ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सागरतट स्वच्छता दिनी आॅक्टोबर २०१५ पासून सुरू असलेल्या या स्वच्छता मोहिमेचा शतक पूर्ण करणारा आठवडा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे, असे या मोहिमेचे जनक अॅड. अफरोज शाह यांनी सांगितले. (पूर्वार्ध)
७ लाख किलो कच-याची विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 2:58 AM