मुंबई : राज्य सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेला वेग आला असून, नवीन सरकारने कार्यभार स्वीकारल्यापासून आजतागायत जनहिताचे विविध निर्णय झपाट्याने घेतले आहेत. १ जुलै ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे आठ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३९९ फाईल्सचा निपटारा केला आहे.
विशेष म्हणजे यात नैसर्गिक आपत्तीमधील मदत, गरजूंना मदत, कृषी विभाग, मंत्रिमंडळासमोर आणावयाचे प्रस्ताव, विविध नवीन शासकीय नियुक्त्या, सरळ सेवा भरती, वन विभाग, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागांच्या फाईल्सचा यात समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत विविध विभागांच्या सचिवांना सर्वसामान्यांची तसेच जनहिताची कामे गतिमान रीतीने झाली पाहिजेत तसेच लोकांची कामे अडणार नाहीत.
लाभार्थींना मिळणार मुख्यमंत्र्यांचे पत्र
राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या लाभार्थींना यापुढे मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वाक्षरीने पत्र पाठविण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाचे पालन सर्व विभागांनी करावे, असे पत्र मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सर्व विभागांच्या सचिवांना सोमवारी पाठविले.