मुंबईतील डेब्रिजची ठाणे शहरात विल्हेवाट; ६०० मेट्रिक टन प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 10:16 AM2024-07-04T10:16:15+5:302024-07-04T10:19:12+5:30

मुंबईतील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

disposal of debris from mumbai in thane city completed construction of 600 mt project for processing  | मुंबईतील डेब्रिजची ठाणे शहरात विल्हेवाट; ६०० मेट्रिक टन प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण 

मुंबईतील डेब्रिजची ठाणे शहरात विल्हेवाट; ६०० मेट्रिक टन प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण 

मुंबई : मुंबईतील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतल्या आहेत. इमारतींची बांधकामे आणि पाडकामे यामुळे उडणाऱ्या धुळीच्या नियंत्रणासाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित केली आहे.   

मुंबईत सहा हजारांहून अधिक बांधकामे असून, तेथील कचरा, राडारोडा (डेब्रिज) यावर प्रक्रियेसाठी प्रत्येकी ६०० टन प्रतिदिन एवढ्या क्षमतेचे बांधकाम व पाडकाम कचरा प्रकल्प ठाणे आणि दहिसर येथे बांधण्याचे पालिकेचे नियोजन होते. यापैकी ठाण्यातील प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून, लवकरच तो कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील प्रकल्पांच्या डेब्रिजच्या विल्हेवाटीचा प्रश्न लवकरच निकाली लागणार आहे.  

उपयुक्त उत्पादने बनविणार-

१) डेब्रिजपासून बांधकाम उत्पादने तसेच यांत्रिक प्रक्रिया करून त्यातून बांधकाम क्षेत्राशी संबंधित उपयुक्त उत्पादने बनवली जाणार आहेत. 

२)  उत्पादनांची विक्री करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर सोपविण्यात येणार आहे.

मोकळ्या जागा, महामार्गांच्या कडेला डेब्रिजचे ढीग-
    
मुंबईत विकासकामे वाढल्याने मागील काही वर्षांपसून डेब्रिजचा प्रश्नही गंभीर होत आहे. मोकळ्या जागा आणि महामार्गांच्या कडेला डेब्रिज टाकण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढले आहे. बिल्डरांकडून ठरावीक शुल्क आकारून हे डेब्रिज डम्पिंग ग्राउंडवरही टाकले जाते. डेब्रिज टाकणाऱ्या वाहनांवर वॉर्डस्तरावर पालिका अधिकाऱ्यांकडून कारवाई होऊनही कोणताच फरक पडलेला नाही. 

डेब्रिजवर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने मागील वर्षी प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी कंत्राटदारांना फेब्रुवारी २०२३ मध्ये स्वीकृती पत्र दिले आहे. एक वर्षाच्या कालावधीनंतर म्हणजेच फेब्रुवारी २०२४ पर्यंत प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित होते. या प्रकल्पातील तंत्रज्ञानामुळे डेब्रिजच्या विल्हेवाटीचा प्रश्न तर निकालात निघणार आहे.

कॉल ऑन डेब्रिज सुविधा -

१) घरांची दुरुस्ती किंवा पाडकामातून निर्माण होणाऱ्या डेब्रिजची विल्हेवाट लावताना नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ‘कॉल ऑन डेब्रिज’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

२) त्याअंतर्गत सुमारे ३०० टनांपर्यंतचा डेब्रिज पालिकेच्या वाहनातून नेऊन त्याची विल्हेवाट लावली जाते. डेब्रिज घेऊन जाण्यासाठी पालिका वाजवी शुल्क आकारते. 

३) ‘कॉल ऑन डेब्रिज’ सुविधेचा लाभ घेऊन नागरिकांनी नियमानुसार डेब्रिजची विल्हेवाट लावावी, त्यासाठी अनधिकृत मार्गांचा कोणीही अवलंब करू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Web Title: disposal of debris from mumbai in thane city completed construction of 600 mt project for processing 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.