रविकिरण देशमुख
मुंबई : पाकिस्तान आणि चीन यांच्याशी झालेल्या युद्धानंतर भारताचे नागरिकत्व सोडून त्या देशांत निघून गेलेल्या लोकांच्या मालमत्ता भारतात असल्याचे उघडकीस आल्यानंतर आता त्यांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून एक कोटीपेक्षा कमी किंमत असलेल्या मालमत्ता सध्या वापर करत असलेल्यांना आणि त्यापेक्षा जास्त किंमत असलेल्या लिलावात काढण्याचे प्रस्तावित केले आहे. देशभरातील मालमत्तांचे मूल्य एक लाख कोटी असून त्यातील मुंबई व परिसरातील मालमत्तांची किंमत कैक हजार कोटींमध्ये आहे. यावर अंतिम निर्णय दिल्लीत घेतला जाईल असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
देशात घोषित झालेल्या शत्रू मालमत्तांची संख्या १२ हजार ६११ असून त्यापैकी २०८ मालमत्ता महाराष्ट्रात आहेत. देशभरातील मालमत्तांचे मालक १२,४८५ पाकिस्तानी आणि १२६ चिनी होते ज्यांनी १९४७ ते १९६२ या दरम्यान झालेल्या युद्धानंतर त्या देशांचे नागरिकत्व स्वीकारले. या मालमत्ता प्रामुख्याने मोठ्या जमिनी वा भुखंडांच्या असून त्यावर लोक राहत आहेत अथवा व्यवसाय करत आहेत. आमच्यासमोर मालमत्तांची विल्हेवाट लावताना सर्वाधिक मोठा गुंता मुंबईत आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांनी गोपनीयतेच्या अटीवर सांगितले. काही अपवाद वगळले तर बहुतेक मालमत्तांवर आजही पाकिस्तान व चीनला गेलेल्या लोकांचीच नावे आहेत. यावर केंद्र सरकारचे नाव लावणे हा पहिला टप्पा आहे.
मुंबईतल्या मालमत्तांची विल्हेवाट लावताना त्या म्हाडा, मुंबई महानगरपालिका यांच्याकडे द्याव्यात. सध्या तेथे राहत असलेल्यांचे पुनर्वसन करून त्या विकसित करता येतील. कारण लिलाव करायचा झाल्यास त्यातून कायदेशीर गुंतागुंतीचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतील, असा मुद्दा राज्याकडून पुढे करण्यात आला आहे. लिलाव करायचाच झाला तर तो तिथे राहणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनासह करावा लागेल, असेही राज्याकडून सांगण्यात आले आहे. हे सर्व प्रस्ताव दिल्लीला पाठवा, अशा सूचना केंद्राने राज्याला दिल्या आहेत.
ठाणे, पालघर, रायगडमध्येही आहेत मालमत्ता?
मुंबईतल्या मालमत्ता मलबार हिल, ब्रीच कँडी, खार, वांद्रे, सांताक्रुझ, जुहू अशा उचभ्रू भागापासून ते गजबलेल्या काळबादेवी, गिरगाव, माझगाव, ताडदेव, भायखळा तसेच उपनगरात कुर्ला, मालाड आदी ठिकाणी आहेत.
या मालमत्ता निवासी इमारतींपासून ते दुकाने आणि आता बंद पडलेल्या डायना (ताडदेव) आणि मोती (गोल देऊळ) या बंद पडलेल्या थिएटरच्या आहेत. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर, पालघर, पुणे, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे येथेही अशा मालमत्ता आहेत.
तेथे राहणाऱ्यांचे करायचे काय?
मुंबईतील बहुतेक मालमत्ता एक कोटीहून अधिक मूल्याच्या आहेत. त्या लिलावात काढल्या, तर सध्या तिथे असणाऱ्यांचे काय करायचे हा प्रश्न आहे. अलीकडेच केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी यावर बैठक घेतली. जैसे थे परिस्थितीत केंद्राला फार रस नाही. मालमत्तांची विल्हेवाट लावून तो निधी देशाच्या तिजोरीत जमा व्हावा, असे मत त्यांनी मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.
केंद्र सरकारने गेल्या सप्टेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील १९ शत्रू मालमत्तांची ई-ऑक्शनद्वारे विक्री केली आहे. त्यातून सरकारी तिजोरीत २७०९ कोटी रुपये जमा झाल्याचे मिश्रा यांनी लोकसभेत अलीकडेच एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले आहे.