मंत्रालयात डाॅक्टर-सचिवांमध्ये खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 08:12 AM2022-02-04T08:12:54+5:302022-02-04T08:51:44+5:30
महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे डाॅ. सचिन मुळकुटकर यांच्या नेतृत्वाखाली अस्थायी डाॅक्टरांचे शिष्टमंडळ आपल्या विविध मागण्यांसाठी आज विभागाचे सचिव सौरभ विजय यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयातील त्यांच्या दालनात पोहचले. मात्र भेटीची वेळ देऊनही ऎनवेळी ताटकळत ठेवण्यात आले आणि भेट नाकारली
मुंबई : महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव विजय सौरभ यांच्यात गुरुवारी मंत्रालयात जोरदार खडाजंगी उडाली.
महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे डाॅ. सचिन मुळकुटकर यांच्या नेतृत्वाखाली अस्थायी डाॅक्टरांचे शिष्टमंडळ आपल्या विविध मागण्यांसाठी आज विभागाचे सचिव सौरभ विजय यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयातील त्यांच्या दालनात पोहचले. मात्र भेटीची वेळ देऊनही ऎनवेळी ताटकळत ठेवण्यात आले आणि भेट नाकारली. उलट, मुळकुटकर यांना पाहून घेऊ आणि निलंबित करण्याची धमकी सौरभ विजय यांनी दिल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यासंदर्भातील व्हिडिओसुद्धा डाॅक्टरांनी जारी केला आहे. यात सौरभ विजय हे संतप्तपणे डाॅक्टरांच्या शिष्टमंडळाला सुनावत असल्याचे दिसून येत आहे. भेटीची वेळ घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, आधीच वेळ घेऊन भेटायला गेले असता अशाप्रकारे वागणे योग्य नसल्याचे उपस्थित डाॅक्टर त्यांना सांगत होते. आपल्या पीएकरवी वेळ घेऊनच आलो. किमान निवेदन स्वीकारण्याचे आणि नीट बोलण्याचे सौजन्य दाखवावे. डाॅक्टरांशी असे वर्तन खपवून घेणार नसल्याची भूमिका डाॅक्टरांनी घेतली. यावेळी, निलंबित करण्याच्या सौरभ विजय यांच्या वक्तव्यावर आक्रमक झालेल्या डाॅक्टरांनी एकालाच नव्हे तर सर्वांना निलंबित करावे लागेल, त्या आधी आम्ही सगळेच राजीनामा देतो, अशी भूमिका घेतली.
दरम्यान, विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी डाॅक्टरांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली. संघटनेचे ४०-५० जण ऐनवेळी मंत्रालयातील कार्यालयात घुसले. ज्येष्ठ डाॅक्टरांनी विद्यार्थ्यांना पुढे करून असे वर्तन करणे अपेक्षित नव्हते. आपल्या कार्यालयात पूर्वनियोजित बैठका असतात. त्यात अशाप्रकारे घुसखोरी करणे चुकीचे आहे. यानंतर काही वेळाने आम्ही पुन्हा भेटलो. त्यांनी मागण्यांचे निवेदनही दिले. जाताना वर्तनाबद्दल खेदही व्यक्त केला. त्यानंतर ते पवित्रा बदलत असतील तर त्याबाबत मी भाष्य करू शकत नाही. डाॅक्टरांच्या मागण्यांबाबत चर्चा सुरू आहे. संबंधित विभागांची मते घ्यावी लागतात. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही सौरभ म्हणाले.
संघटनेचे शिष्टमंडळ आपल्या मागण्यासंदर्भात चर्चा करून मार्ग काढण्यासाठी रीतसर परवानगी घेऊन सचिवांकडे गेले होते. असे असताना सचिवांनी संघटनेच्या सदस्यांना अपमानित करून अशासकीय भाषेचा वापर केला. तसेच कोरोना योद्धा म्हणून शासनाने गौरव केलेल्या डॉक्टरांना बडतर्फ करण्याची धमकी दिली. या वागणुकीचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे संघटनेने म्हटले आहे.