पालिका आयुक्त बंगल्याच्या दुरुस्तीचा वाद पेटला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 02:21 AM2020-08-18T02:21:56+5:302020-08-18T02:22:05+5:30

बंगल्याच्या दुरुस्तीवरील खर्च अनावश्यक असल्याने निविदा रद्द करून रक्कमेत कपात करावी, अशी मागणी भाजपने आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे.

A dispute arose over the repair of the Municipal Commissioner's bungalow | पालिका आयुक्त बंगल्याच्या दुरुस्तीचा वाद पेटला

पालिका आयुक्त बंगल्याच्या दुरुस्तीचा वाद पेटला

Next

मुंबई : महापालिका मुख्यालयात बाऊन्सर नियुक्तीचा वाद चर्चेत असताना आता आयुक्तांच्या बंगल्याच्या दुरुस्तीचा वाद पेटला आहे. या हेरिटेज वास्तूमध्ये गळती असल्याने तत्काळ दुरुस्तीची गरज असल्याच्या मतावर आयुक्त ठाम आहेत. मात्र पालिका आर्थिक संकटात असताना बंगल्याच्या दुरुस्तीवरील खर्च अनावश्यक असल्याने निविदा रद्द करून रक्कमेत कपात करावी, अशी मागणी भाजपने आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत आयुक्त विरुध्द विरोधी पक्ष असा वाद रंगला आहे. भाजपने आयुक्तांच्या दालनाबाहेर निदर्शने केल्यानंतर १८ बाऊन्सर महापालिका मुख्यालयात नियुक्त करण्यात आले. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यामुळे आयुक्तांनी बाउन्सरची संख्या निम्म्यावर आणली. त्यानंतर आता आयुक्तांच्या दुरुस्तीचा वाद रंगला आहे. मलबार हिल येथे महापालिका आयुक्तांसाठी असलेले निवासस्थान पुरातन वास्तू असल्याने त्यात वारंवार दुरुस्तीची गरज पडत आहे. मात्र या बंगल्याच्या दुरुस्तीवर गेल्या तीन-चार वर्षात दीड कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप विरोधी पक्ष करीत आहे.
यावेळेस दुरुस्तीवर ४० लाख नव्हे तर ९८ लाख रुपये खर्च केले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यासाठी मार्च महिन्यात निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र सध्या महापालिकेवर आर्थिक संकट आणि कोरोनाची महामारी सुरू असताना हा खर्च कशासाठी असा सवाल भाजपचे नगरसेवक व पालिकेतील नेते विनोद मिश्रा यांनी केला आहे. ही निविदा रद्द करून खर्चात कपात करावी, अशी मागणी मिश्रा यांनी सोमवारी पत्राद्वारे आयुक्त आणि महापौर यांच्याकडे केली आहे.
>दुरुस्ती आवश्यक : या बंगल्याचे ऑडिट जून २०१९ मध्ये करण्यात आले आहे. या अहवालामध्ये बंगल्याची दुरुस्ती व संवर्धनात्मक कामे करण्याच्या शिफारशी आहेत. या बंगल्याचे बांधकाम १०० वर्ष जुने व छत कौलारू स्वरूपाचे आहे. पावसाळ्यामध्ये या बंगल्यात पाणीगळतीमुळे भिंतीमध्ये ओलावा, भिंतीना तडे जाणे, लाकडी खिडक्या व दरवाजे यांच्यासह भिंतीमध्ये वाळवीचा प्रादुर्भाव होणे या प्रकारच्या समस्या वरचेवर उद्भवत असतात. या बंगल्यामध्ये गेली अनेक वर्षे विशेष व मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्त्या झालेल्या नाहीत. केवळ किरकोळ दुरुस्त्या केल्या आहेत. सदर बंगल्याचे पुरातन वास्तुमूल्य टिकून राहण्यासाठी तसेच तो राहण्यायोग्य होण्याच्या दृष्टीने विशेष दुरुस्ती करण्यासाठी मुंबई संस्कृती वारसा जतन समितीची परवानगी घेण्यात आली आहे. पालिका आयुक्त सेवानिवासस्थान दुरुस्ती व संवर्धनाची प्रशासकीय प्रक्रिया ही सुमारे वर्षभरापूर्वीपासूनच सुरू आहे. त्यामुळे कोविड १९ संसर्गाच्या काळात प्रशासन उधळपट्टी करत असल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: A dispute arose over the repair of the Municipal Commissioner's bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.