Samadhan Sarvankar vs Mahesh Sawant: दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मंडईत दोन्ही शिवसेनेच्या गटात चांगलीच जुंपली. माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर फुल मार्केटमधील बॅनर काढण्यावरुन महापालिका कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं. त्यानंतर आमदार महेश सावंत यांच्यावर हफ्ते गोळा करत असल्याचा आरोप समाधान सरवणकर यांनी केला. त्यानंतर महेश सावंत यांनी समाधान सरवणकर यांना चांगलेच सुनावलं आहे. वडिलांच्या पुण्याईवर नगरसेवक झाला आहात अशा शब्दात आमदार सावंत यांनी समाधान सरवणकरांची खरडपट्टी काढली.
शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्यात दादरच्या फुल मार्केटमध्ये वाद झाला. दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मंडईत लावलेल्या बॅनवरुन हा वाद सुरु झाला. फुल मंडईतील बँनर काढण्यासाठी पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आल्याने समाधान सरवणकर तिथे पोहोचले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना बॅनरचा काय त्रास आहे असं म्हणत जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी आमदारांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.हप्ते
आमदार महेश सावंत यांचे नाव ऐकताच समाधान सरवणकर संतापले. "स्टेशनच्या बाहेर विक्रेत्यांकडून हप्ते येतात म्हणून महेश सावंत गप्प आहेत. महेश सावंत यांचे ऐकण्यासाठी ते आहेत कोण? मराठी लोकांना त्रास दिला जात आहे. हप्ते घेण्यासाठी महेश सावंत काय काय करणार आहेत. लोकांनी काम करण्यासाठी निवडून दिलं आहे. इथे कालिदास कोळंबकर आमदार आहेत तुमचा इथे संबंध काय? दादर स्टेशनबाहेरील आधी हप्ते बंद करा," असं समाधान सरवणकर यांनी म्हटलं.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार महेश सावंत यांनी मंडईत जाऊन समाधान सरवणकर यांना सुनावले. "काल इथे वेड्यांची जत्रा भरली होती. माजी आमदाराचा बालिश पुत्र इथे आला होता. त्याला अजून राजकारणाचा र माहिती नाही. बापाच्या पुण्याईवर नगरसेवक झाला आहे. हप्ते घेऊन कोण मोठं झालंय हे त्यांना कळत नाही. एवढ्याशा खोलीत राहत होते आज मोठ्या घरात राहायला गेले आहेत. कुठे काय बोलायचं हे त्यांना कळत नाही. या विषयामध्ये राजकारण आणण्याची काहीच गरज नव्हती. ही तक्रार माझी नव्हती तर इथल्या मार्केट अधिकाऱ्यांची होती," असं महेश सावंत यांनी म्हटलं.
"समाधान सरवणकर हे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. लोकांना त्यांनी घरी बसवल्यामुळे काहीतरी उचापत्या करत आहेत. तीन टर्म आमदार असून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील प्रदूषण दूर करण्याचा त्यांच्याकडे वेळ नव्हता," असंही महेश सावंत म्हणाले.