मुंबई : निधी वाटपावरून शिवसेना - भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये राजकीय आखाडा रंगला आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपल्याला व्हॉट्सॲपवरून जिवे मारण्याची धमकी दिल्याने स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी दिला आहे, तर जाधव यांनी या आरोपांचे खंडन करीत भाजप हे धनदांडग्यांचा विचार करणारे असून, त्यांना गरिबांची चिंता नाही, असा आरोप करीत मिश्रा यांच्यावर वेळ पडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
विभाग स्तरावरील विकासकामांसाठी ७०० कोटींचा निधी सन २०२० - २१ या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आला. या निधी अंतर्गत यशवंत जाधव यांनी त्यांच्या वॉर्डात ३३ कोटी रुपयांची तरतूद करीत खाद्यपदार्थ व भाजीसाठी ट्रक - पाच कोटी, ज्युटच्या पिशव्या व व्यायामशाळा साहित्यासाठी प्रत्येकी दीड कोटी अशा अवाजावी तरतुदी केल्या. यापैकी ज्युटच्या पिशव्यांची खरेदी बाजारभावाच्या अनेक पटीने करण्यात येत आली असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला आहे. या खरेदीची निविदा रद्द करून ऑडिट करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
यशवंत जाधव यांनीदेखील मिश्रा यांच्यावर खिचडी घोटाळ्याचा आरोप केला असल्याचे मिश्रा यांचे म्हणणे आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी जाधव यांना वॉट्सॲपवर पत्र पाठवले असता त्यांनी अर्वाच्य भाषेत उत्तर देत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मिश्रा यांनी केला. मात्र मिश्रा यांनी दाखवलेले मेसेज आपले नाहीत. असे आरोप करताना त्यांनी मोबाईल नंबरही दाखवणे आवश्यक होते. महापौर आणि मी भाजपच्या मार्गात प्रमुख अडसर ठरत असल्याने, आम्हा दोघांना आणि पर्यायाने शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा जाधव यांनी भाजपवर आरोप केला.