ठाण्यात वाद चिघळला; शिवसैनिकांनी मनसे समर्थकाला केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 10:14 AM2020-08-17T10:14:10+5:302020-08-17T10:14:15+5:30

गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेना- मनसेमधील वाद वाढतच चालला आहे.

Dispute erupted in Thane; Shiv Sainiks beat up MNS supporter | ठाण्यात वाद चिघळला; शिवसैनिकांनी मनसे समर्थकाला केली मारहाण

ठाण्यात वाद चिघळला; शिवसैनिकांनी मनसे समर्थकाला केली मारहाण

Next

मुंबई: मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची अटक आणि सुटका या प्रकरणावरुन ठाण्यात शिवसेना विरुद्ध मनसे असा वाद रंगला आहे. मात्र हा वाद रंगला असतानाच एका मनसे समर्थकाला शिवसैनिकांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. 

ठाण्यात सोशल मीडियात आक्षेपार्ह टीप्पणी करणाऱ्या मंगेश माने या मनसे समर्थक तरुणाला शिवसैनिकांनी चोप दिला आहे. यानंतर शिवसैनिकांनी त्याला नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मंगेश मानेला पोलिसांनी अटक केली होती. मात्र ठाणे न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल मांगले यांनी दिली.

तत्पूर्वी, अविनाश जाधव यांना अटक आणि तडीपारीची नोटिस आल्यानंतर त्यांनी मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत निशाणा साधला होता. यानंतर शिवसेनेने देखील प्रत्युत्तर दिले. मात्र या प्रकरणानंतर गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेना- मनसेमधील वाद वाढतच चालला आहे.

शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी एक व्हडिओ बनवून अविनाश जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रताप सरनाईक म्हणाले की, अविनाश जाधव तुझा काल व्हिडिओ पाहिला. तुझा व्हिडिओ पाहिल्यानंतर  मला तुझ्यावर खूप दया आली.  जेव्हा आंदोलन करण्याची भूमिका घेतो तेव्हा मलाही वाटते की सर्वसामन्य जनतेच्या प्रश्नासाठी तू लढतो आहे. परंतु गेल्या वर्षाभरामध्ये बघितलं तर तु ज्या पद्धतीने जेव्हा सर्वांनी दहिहंडीचा उत्सव रद्द केला असताना जाणीवपूर्वक तू दहिहंडीचे आयोजन करतो. कधी कुठल्या राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो. तर कधी भाजपाच्या नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो. तसेच जाणीवपूर्वक तु ठाण्यातलं गेल्या अनेक वर्षापासून असलेलं वातावरण बिघडवण्याचं प्रयत्न करतो आहे, असा आरोप प्रताप सरनाईक यांनी अविनाश जाधव यांच्यावर केला आहे.  



शिवसेनेच्या नादाला लागायचा प्रयत्न कोणी केला तर सोडणार नाही!
शिवसेना आमदार श्री प्रताप सरनाईक साहेबांचा कडक इशारा.....

Posted by शिवसेना 2.0 on Saturday, 15 August 2020

प्रताप सरनाईक यांच्या या टीकेनंतर अविनाश जाधव यांनी देखील व्हिडिओद्वारे आव्हान दिले आहे. अविनाश जाधव म्हणाले की, मी बाळासाहेबांच्या प्रत्येक शिवसैनिकांचा आदर करतो, कोणत्या शिवसैनिकाला उचलणं हा माझा धंदा नाही. आम्ही सगळे बाळासाहेबांच्या मुशीतले आहोत, आम्हाला राजसाहेबांची शिकवण आहे. त्यामुळे शिवसैनिकांबद्दल मनात प्रचंड नितांत आदर आहे. परंतु माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल झाले त्याबद्दल ते का नाही बोलले? असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे.  तसेच मला शिवसैनिकांचा नितांत आदर आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ. आज अनेक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत जे राजसाहेबांचा आदर करतात. शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ असं म्हणणाऱ्यांनी उत्तर द्यावं, आम्ही वाट पाहतोय असं आवाहन देखील अविनाश जाधव यांनी प्रताप सरनाईक यांना दिले आहे.

#हे_घ्या_उत्तर #AvinashJadhav #अविनाश_जाधव

Posted by मा. अविनाश जाधव अधिकृत on Saturday, 15 August 2020

राजन विचारे यांनी देखील अविनाश जाधव यांच्यावर केली टीका- 

एका रात्रीत आणि केवळ व्हिडओ बाईट देऊन कोणी नेता बनत नाही, उचलून नेण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ, प्रत्येक जण कतृत्वाने मोठो होत असतो. डावखरे यांनी देखील किती वर्ष काम केले आहे, त्यातूनच ते आमदार आणि सभापती झाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे देखील हे एक शाखा प्रमुख होते, पुढे नगरसेवक, सभागृह नेता, आमदार झाले. त्यानंतर मंत्री पालकमंत्री, विरोधी पक्ष नेता झाले एवढी सर्व पदे मागील २५ ते ३० वर्षे ते ठाणो शहरात काम करीत आहेत. कार्यकर्ता असाच घडत नसतो, सकाळी व्हिडीओ करायचा टिका करायची आणि सोडून द्यायची अशी टिका शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी अविनाश जाधव यांच्यावर केली.

त्याचसोबत केवळ टीका करण्याशिवाय तुम्हा काय केले, या आव्हानाच्या गोष्टी तुम्ही आमच्या सारख्यांना सांगूनका अजूनही आमच्यातील शिवसैनिक जागा आहे. आम्ही कोणत्याही पदावर असलो तरी आमचे शिवसेनेचे जे पद आहे, तो शिवसैनिक असतो. घरातून उचलून नेन्याची धमकी आम्हाला देऊ नका आम्ही काय लहान मुल नाही, तुम्ही तुमच्या औकातीत रहा आणि निमुटपणे पक्षाचे काम करा, चांगली कामे असतील आम्ही सहकार्य करु परंतु अशी टीका, आव्हान देणार असाल तर आमच्या नादीसुद्धा लागू नका असा इशाराही राजन विचारे यांनी दिला होता.

मनसेचे नेतेही अविनाश जाधव यांच्या समर्थनासाठी मैदानात-

अविनाश जाधव यांच्या मागे सर्व महाराष्ट्र सैनिक खंभीरपणे उभे आहेत, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. तसेच अविनाश जाधव यांच्या एका विधानानंतर ठाण्यातील काही उंदीर बाहेर येत आहे, असा टोला देखील संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. 

Web Title: Dispute erupted in Thane; Shiv Sainiks beat up MNS supporter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.