Join us

उद्धव ठाकरेंची एक घोषणा अन् मविआत वादाची ठिणगी; वर्षा गायकवाडही स्पष्टच बोलल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 6:02 PM

मविआचं जागावाटप होण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली

Uddhav Thackeray Vs Congress ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून महाविकास आघाडीत अजूनही खलबतं सुरू असून काही जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मतभेद असल्याचं बोललं जात आहे. अशातच काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. मविआचं जागावाटप होण्याआधीच उद्धव यांनी उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून माजी खासदार संजय निरुपम यांच्यानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

वर्षा गायकवाड यांनी एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "मुंबईतील लोकसभा मतदारसंघाच्या जागांच्या वाटपासंदर्भात हे नमूद करू इच्छिते की, महाविकास आघाडीची चर्चा अजून सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे, निर्णय अद्याप झालेला नाही," अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे जागावाटप जाहीर होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरल्याचं पाहायला मिळत आहे.

उमेदवाराची घोषणा करताना उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

उद्धव ठाकरेंनी काल सायंकाळी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अंधेरी पूर्व व जोगेश्वरी पूर्व, वर्सोवा व अंधेरी पश्चिम येथील चार विधानसभा क्षेत्रातील चार शिवसेना शाखांना भेटी देऊन  शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून आपल्या पक्षाचे उपनेते आणि युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली. आता मी तुम्हाला उमेदवार दिलेलाच आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हणताच शिवसैनिकांनी अमोल कीर्तीकरांच्या नावाची घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांना जवळ बोलावले आणि म्हणाले की, "एका निष्ठेने आणि जिद्दीने जिंकणारच, या निष्ठेने अमोल लढतोय.अमोलच्या पाठीसुद्धा चौकशीचं शुक्लकाष्ठ लावण्याचा प्रयत्न चालूच आहे. पण मी सगळ्यांना सांगतोय, सगळे दिवस सारखे नसतात. आज तुम्ही आमच्या मागे लागला आहात. पण उद्या येणारं सरकार आमचं आहे आणि ते सरकार आल्यानंतर जे जे लोक माझ्या सैनिकांना त्रास देत आहेत. त्या सगळ्यांना मी तुरूंगात टाकल्याशिवाय राहणार नाही'', असा इशारा ठाकरेंनी भाजपला दिला. 

दरम्यान, या मतदारसंघातून काल उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यावर आता अमोल यांचे वडील आणि सलग दोन वेळा खासदार असलेले गजानन कीर्तीकर काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळ आणि मतदारसंघाचे लक्ष लागलं आहे.

टॅग्स :वर्षा गायकवाडउद्धव ठाकरेमुंबईमहाविकास आघाडीलोकसभा निवडणूक २०२४