१ खासदार, ३ आमदार तरीही मैदान नाही: वरळीतील भाजपाच्या दहिहंडीवरून शिवसेनेत वाद?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 03:25 PM2022-08-17T15:25:06+5:302022-08-17T15:25:40+5:30
महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात भाजपाकडून मोठा उत्सव साजरा करण्यात येत आहे.
मुंबई - भाजपाच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आशिष शेलारांकडे आल्यानंतर आता शेलारांनी सूत्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे. अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर पहिलाच आलेला सण म्हणजे दहिहंडी. मुंबईत दहिहंडीचा उत्साह पाहता भाजपाने थेट शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यात मतदारसंघात मोठ्या दहिहंडीचं आयोजन केले आहे. विशेष म्हणजे दरवर्षी सचिन आहिर ज्या जांबोरी मैदानात हंडीचे आयोजन करतात त्याचठिकाणी यंदा भाजपा दहिहंडी उभारणार आहे. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थतेचं वातावरण आहे.
वरळी विधानसभेचे नेतृत्व पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे करत आहेत. त्यात वरळीत आदित्यसह पक्षाचे ३ आमदार, १ खासदार असूनही शिवसेनेला मैदान हाती लागलं नाही. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरही याच भागात राहतात. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाने याची दखल घेत पक्षातील पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी नेत्यांना विचारणा केली असती मैदान खराब होऊ नये म्हणून घेतले नाही अशी सारवासारव केली.
महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात भाजपाकडून मोठा उत्सव साजरा करण्यात येत आहे. वरळी जांबोरीत मुंबई भाजपातर्फे दहिहंडी आयोजित केली जात आहे. बुधवारी सायंकाळी शिवसेनेच्या नेत्यांची बैठक शिवसेना भवनात पार पडली. तेव्हा स्थानिक नेत्यांच्या उदासीनतेबद्दल पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली. वरळीतील मोक्याचे मैदान भाजपानं पटकावल्यामुळे आता नव्या जागेची शोधाशोध सुरू करण्यात आली आहे.
वरळीत शिवसेनेचे तीन आमदार आहे. आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडून आले आहेत. तर वरळी परिसरातच राहणारे सुनील शिंदे आणि सचिन अहिर हे विधान परिषदेचे आमदार आहेत. या परिसरातील खासदार शिवसेनेचे नेते अरविंद सावंत आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा याच परिसरातील आहेत. शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक वरळीतच राहतात. असे असतानाही भाजपने जांबोरी मैदान पटकावण्यात यश मिळवले आहे.