Join us

अदनान सामीला 'पद्मश्री' देण्यावरुन वाद पेटला; मनसेपाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादीनेही केला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 12:04 PM

शनिवारी केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

ठळक मुद्देअदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्यावरुन राष्ट्रवादीचा विरोधहा तर देशाचा अपमान - नवाब मलिकजय मोदी नारा देणाऱ्याला मिळतो पुरस्कार

मुंबई - गायक अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्यावरुन मनसेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोध केला आहे. पाकिस्तानमधून कोण इथं येऊन जय मोदी हा नारा देत असेल तर त्याला देशाचं नागरिकत्व दिलं जातं अन् पद्मश्री पुरस्कार मिळतो हे स्पष्ट उदाहरण आहे. अदनान सामीला पुरस्कार देणं हा देशातील जनतेचा अपमान आहे अशी टीका महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी नेते नवाब मलिकांनी केली आहे. 

शनिवारी केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामध्ये कला क्षेत्रातून ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्यासह गायक अदनान सामीला देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. मात्र, अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला होता.  

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय, तोच आनंदावर थोडं विरजण पडलं अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे असं अमेय खोपकर यांनी म्हटलं होतं. याशिवाय, 2015 मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता. 

तर काँग्रेसनेही अदनान सामी  गायक अदनान सामीला पद्मश्री दिल्याबद्दल कॉंग्रेसने रविवारी प्रश्न उपस्थित करून हा पुरस्कार मिळविण्यासाठी भाजपाची चमचेगिरी करणे हा मापदंड झाला असल्याची टीका केली. काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी कारगिल युद्धात सामील झालेल्या सैनिक सनाउल्लाहला घुसखोर घोषित का करण्यात आले, हा प्रश्न उपस्थित केला आहे. पद्म सन्मान दिल्या जात असलेल्या सामीच्या वडिलांनी पाकिस्तानच्या वायुसेनेत राहून भारताविरुद्ध गोळीबार केला होता. शेरगिल यांनी एक व्हिडीओ जारी करून भारतीय सेनेचे शूर शिपाई आणि भारतमातेचे पुत्र मोहम्मद सनाउल्लाह यांनी पाकिस्तानविरुद्ध कारगिलची लढाई लढली. त्यांना एनआरसीच्या माध्यमातून घुसखोर घोषित करण्यात आले. दुसरीकडे अदनान सामीला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले असा आरोप केला आहे.  

टॅग्स :अदनान सामीमनसेराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसभाजपा