महापालिकेतील डॉक्टर भरतीवरून झाला वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 01:57 AM2020-12-18T01:57:36+5:302020-12-18T01:57:41+5:30
प्रमुख रुग्णालयातील डॉक्टरांपेक्षा अधिक पगार तसेच निवृत्तीचे वय ६५ करण्याचा प्रशासनाचा विचार सुरू
मुंबई : महापालिकेने उपनगरीय रुग्णालयात डिप्लोमा नॅशनल बोर्ड या नव्या अभ्यासक्रमासाठी प्राध्यापकांची भरती करण्यात येणार आहे. त्यांना प्रमुख रुग्णालयातील डॉक्टरांपेक्षा अधिक पगार तसेच निवृत्तीचे वय ६५ करण्याचा प्रशासनाचा विचार सुरू आहे.
पालिकेने वैद्यकीय पदवीनंतरचा डिप्लोमा नॅशनल बोर्ड हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन श्रेणीतील प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पहिल्या श्रेणीत पाच वर्षांचा अनुभव असलेले ८६ प्राध्यापक नियुक्त केले जाणार आहेत. त्यांना दोन लाख रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. तर दुसऱ्या श्रेणीसाठी ८६ पदे असून त्यांचे वेतन दीड लाखापर्यंत ठरवण्यात आले आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याचे सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिले.
असा आहे वाद..
डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६०, मग ६२ आणि आता ६५ वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय प्रशासन घेत आहे. या निर्णयामुळे ज्युनिअर डॉक्टरांच्या पदोन्नतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे धोरणात्मक निर्णय घेताना प्रशासनाने गटनेत्यांशी चर्चा करावी, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.
कोविड योद्ध्यांना नोकरीची संधी द्यावी...
कोविड योद्ध्यांना नोकरीत प्राधान्य दिल्यास त्यांच्या कार्याचा सन्मान होईल, असे मत अध्यक्ष जाधव यांनी व्यक्त केले. पालिकेने आरोग्य खात्यात भरती करताना अशा कोविड योद्ध्यांना संधी द्यावी, असे निर्देशही त्यांनी पालिका प्रशासनाला दिले.