घाटकोपरच्या प्लॅटफॉर्म चालत असतानच मागून झाला जीवघेणा हल्ला; सीटच्या वादातून तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 01:10 PM2024-11-24T13:10:12+5:302024-11-24T13:12:16+5:30
मुंबई लोकलमध्ये बसण्यावरुन घाटकोपर स्थानकावर एका व्यक्तीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Mumbai Crime :मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना वादावादीच्या अनेक घटना घडत असतात. अनेक वेळा धावत्या ट्रेनमध्ये किरकोळ वादाचे रुपांतर हाणामारीत होते. अशीच एक घटना घाटकोपर रेल्वे स्थानकावर घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या हाणामारीत एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवत अल्पवयीन मुलाने एका प्रवाशावर जीवघेणा हल्ला केला होता. घटनेची माहिती मिळताच आरपीएफच्या पथकाने धाव घेत जखमी प्रवाशाला तातडीने रुग्णालयात नेले होते. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
लोकल ट्रेनमध्ये सीटच्या वादातून एका अल्पवयीन मुलाने ३५ वर्षीय अंकुश भालेराव यांची हत्या केली. घाटकोपर रेल्वे स्थानकावर हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. कुर्ला रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला हत्येच्या आरोपाखाली आणि त्याच्या मोठ्या भावाला घटनेशी संबंधित पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीला डोंगरी बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. आरोपीचा भाऊ मोहम्मद सनाउल्ला शेख उर्फ सोहेल याला स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अंकुश भालेराव १४ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता टिटवाळ्याहून घाटकोपरला जाण्यासाठी फास्ट लोकल पकडत होते. यावेळी त्यांचा एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत सीटवर बसण्यावरून वाद झाला. त्यादरम्यान, अंकुश आणि त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या अन्य दोन प्रवाशांनी अल्पवयीन मुलाला मारहाण केली. दुसऱ्या दिवशी घाटकोपर स्थानकाच्या फलाटावर अल्पवयीन मुलाने अंकुशवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर अंकुशला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उपचारादरम्यान अंकुशचा मृत्यू झाला.
एसटीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, गुन्हे शाखेचे रोहित सावंत, कुर्ला जीआरपीचे वरिष्ठ पीआय संभाजी यादव, पीआय प्रशांत सावंत यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोहम्मद सन्नाउल्ला उर्फ सोहेल याला गोवंडी येथून अटक केली. चौकशीत सोहेलने पोलिसांना सांगितले की, त्याच्या १६ वर्षीय लहान भावाने अंकुश भालेराववर चाकूने हल्ला केला होता. गुन्हा केल्यानंतर त्याने हत्येसाठी वापरलेला चाकू घरात लपवून ठेवला आणि अटक टाळण्यासाठी केस कापून त्याने ओळख लपवली होती.
दरम्यान, कुर्ला जीआरपीचे वरिष्ठ पीआय संभाजी यादव यांनी सांगितले की, अंकुशच्या हत्येप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.