मुंबई : राहुल गांधी आणि स्त्रियांबद्दल सोशल मीडियातून अपमानास्पद टिपणी करणारे मुंबई विद्यापीठ अकॅडमी आॅफ थिएटर आर्ट (एमटीए) चे संचालक योगेश सोमण यांना अखेर मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. यामुळे विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनात राजकीय वाद उफाळला असून वातावरण तापले आहे. एकीकडे एनएसयूआय, छात्रभारती सारख्या संघटनांनी याचे स्वागत केले आहे. एनएसयूआयने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणे हा कायमस्वरूपी उपाय नसून त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. तर अभावीपने मात्र या कारवाईचा निषेध केला आहे. सोमण यांच्यावरील कारवाई राजकीय प्रेरणेने केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अकॅडमी आॅफ थिएटर आर्टचे विद्यार्थी, छात्र भारती विद्यार्थी संघटना, एआयएसएफचे कार्यकर्ते यांनी १३ जानेवारी सकाळपासून ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. गेल्या सहा महिन्यांपासून नाट्य शास्त्राच्या मुलांना शिकवण्यासाठी प्रध्यापक नसल्यामुळे मुलांचे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांवर एक विशिष्ट विचारधारा थोपवली जात आहे. हंगामी शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे भोंगळ कारभार करणाऱ्या एमटीएचे संचालक योगेश सोमण यांची हकालपट्टी केली पाहिजे, अशा विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या. सोमवारी रात्री सोमण यांना रजेवर पाठवत असल्याचे पत्र कुलसचिवांनी आणून दिल्यानंतर अकॅडमी आॅफ थिअटर आर्टच्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
अभाविपने मात्र या कारवाईचा निषेध केला आहे. सोमण यांच्यावरील विद्यापीठाने केलेल्या कारवाईनंतर विभागातील विद्यार्थ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत, सोमण यांच्या समर्थनार्थ मंगळवारी ५० विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु व कुलसचिवांना निवेदन पाठविले आहे. त्यात त्यांनी चुकीच्या माहिती आधारे सोमणावर कारवाई केल्याचे निदर्शनास आणून दिले़ सत्य परिस्थिती वेगळी असल्याचेही विद्यार्थ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी, अशी विनंती विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली आहे. सोमण यांच्यासारख्या देशप्रेमी व्यक्तीची संचालक म्हणून नियुक्तिनंतर अनेकांची दुकाने बंद झाल्याचा राग ठेवून वारंवार त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मत अभाविपने व्यक्त केले आहे.मुंबई विद्यापीठातील या घडामोडीना विद्यार्थी संघटनांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वळण मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून मुंबई विद्यापीठात अभिनेते योगेश सोमण याच्या बाबतीत जे घडते आहे, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेणे, या सगळ्या गोष्टी आता असहिष्णुतेत बसत नाहीत का? असा सवाल भाजप नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.