लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अहमदनगर येथे साडेपाच गुंठ्याच्या वडीलोपार्जित सामाईक प्लॉटच्या वादातून चुलत भावानेच अतिरेकी बनवून, मुंबईत तीन दहशतवादी घुसले असून त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा करणारा कॉल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात ७ एप्रिल रोजी दुपारी बारा राजा ठोंगे नावाच्या मोबाईल क्रमांकावरून कॉल केला. दुबईवरून शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी मुंबईत आले असून त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा त्याने केला. यातील एकाचे नाव मुजीब सय्यद असून त्याचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबर त्याने पोलिसांना दिला आहे. तसेच, या व्यक्तींचा दोन नंबरचा धंदा असल्याचाही दावा कॉलरने केला. कॉलरने तो पुण्यावरुन बोलत असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवत पोलिसांनी शोध सुरू केला.
एटीएसनेही याचा समांतर तपास सुरू केला. गुन्हयामध्ये तांत्रिक विश्लेषण, सी.सी.टी.व्ही. फुटेज व गोपनिय बातमीदारामार्फत तपास करत असताना मुजिब मुस्तफा सय्यद याचा चुलत भाऊ यासिन याकुब सय्यद याने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
चौकशीत मुजीब सय्यद व आरोपी यासीन सय्यद यांचा भवानीनगर, अहमदनगर येथे साडेपाच गुंठ्याचा वडीलोपार्जित सामाईक प्लॉट असून त्या प्लॉटच्या वादावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन मुजीब व त्याच्या कुटूंबियांना पोलीसांकडून त्रास व्हावा या उद्देशाने खोटी माहिती देवून गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. गुन्हयामध्ये आरोपीने कोणत्याही प्रकारचा पुरावा मागे राहणार नाही याची दक्षता घेवून गुन्हा केला होता. दहशतवाद विरोधी पथक, नाशिक युनिटचे अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे कौशल्यपुर्ण तपास करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. पुढील तपासासाठी आरोपीला आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या त्याब्यात देण्यात येणार असल्याचेही एटीएसने नमूद केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"