मुंबई पदवीधरच्या मतदार नोंदणीत घोळ; मतदारांची नावे ठरवून बाद केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 05:54 AM2024-06-21T05:54:08+5:302024-06-21T05:54:35+5:30
पदवीधर मतदारसंघासाठी नाव नोंदणीचा अर्ज भरताना स्लीप दिली जाते. जर अर्ज नाकारला गेला, तर कारण दिले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर निवडणुकीसाठीच्या मतदार नोंदणीत मोठा घोळ झाला आहे. उद्धवसेनेच्या वतीने नोंदविण्यात आलेली मतदारांची नावे ठरवून आणि कोणतेही कारण न देता बाद करण्यात आली आहेत. भाजपने नोंदविलेली नावे जशीच्या तशी आली आहेत, असा आरोप मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उद्धवसेनेचे उमेदवार अनिल परब यांनी येथे केला. मतदारांची नावे ठरवून बाद करण्यात आली की यात त्रुटी राहिली, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
येत्या २६ जून रोजी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी झालेल्या मतदार नोंदणी तसेच मतदारांना पात्र-अपात्र ठरविण्यावरून परब यांनी गुरुवारी निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप केला. पदवीधर मतदारसंघासाठी नाव नोंदणीचा अर्ज भरताना स्लीप दिली जाते. जर अर्ज नाकारला गेला, तर कारण दिले जाते. आम्ही नोंदविलेल्या हजारो नावांपैकी अनेक नावे ठरवून बाद करण्यात आली. मतदार म्हणून नावनोंदणी करताना अर्ज चुकीचा असेल किंवा कागदपत्रे योग्य नसतील तर अर्ज स्वीकारला जात नाही. माझ्या स्वत:च्या मुलीचा अर्ज फेटाळला गेला.
मतदान प्रक्रियेत त्रुटी?
एकाच घरात आणि एकाच पत्त्यावर राहणाऱ्या नवरा-बायकोपैकी एकाला पूर्वेला तर दुसऱ्याला पश्चिमेचे मतदान केंद्र देण्यात आले आहे. वांद्रे येथे राहणाऱ्या मतदाराला मुलुंडला तर काहींना विक्रोळीचे मतदान केंद्र देण्यात आले आहे. इतक्या लांब मतदान केंद्र देण्यात आले असेल तर वांद्रे येथील मतदार मुलुंडला मतदानाला कशाला जाईल, असा सवाल परब यांनी केला. पदवीधर मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम लावण्यात आले आहे. तर या निवडणुकीत टपाली मतदानाची तरतूद नाही, याकडे परब यांनी लक्ष वेधले.