नाट्य निर्मात्यांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर! शिवाजी मंदिर नाट्यगृहावरून २ निर्माता संघात कलगीतुरा
By संजय घावरे | Published: December 25, 2023 07:03 AM2023-12-25T07:03:04+5:302023-12-25T07:04:08+5:30
मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या वतीने श्री शिवाजी मंदिरमध्ये नाट्यप्रयोग होणार!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने दादरमधील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये १ जोनवारीपासून प्रयोग न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने नाट्यगृहात प्रयोग सुरूच राहणार असल्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे मराठी नाट्य निर्मात्यांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. नाट्यधर्मी निर्माता संघाने आपल्या २३ नाटकांचे प्रयोग शिवाजी मंदिरमध्ये होणार नसल्याचे जाहिर केले होते. त्यांना शह देत व्यावसायिक निर्माता संघाने हा निर्णय घेतल्याची नाट्यसृष्टीत चर्चा आहे.
मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या वतीने श्री शिवाजी मंदिरमध्ये नाट्यप्रयोग होणार! अशा आशयाचे प्रसिद्धीपत्रक काढत आपल्या नाटकांचे प्रयोग होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 'शिवाजी मंदिर नाट्यगृहावर निर्मात्यांचा बहिष्कार' हे वृत्त चुकीचे असल्याचे ज्येष्ठ निर्माते व मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ, मुंबईचे अध्यक्ष संतोष काणेकर यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. पत्रकात असे लिहिले की, व्यावसायिक निर्माता संघ ही नाट्य निर्मात्यांच्या व्यवसायातील समस्या योग्य ठिकाणी मांडून दूर करणारी, ५५ वर्षे जुनी नोंदणीकृत नाट्य निर्मात्यांची संस्था आहे. सध्या या संस्थेचे ४५ नाट्य निर्माते सभासद आहेत. यापैकी कोणीही श्री शिवाजी मंदिर बाबत बहिष्काराचे पाऊल उचलले नाही. संतोष काणेकर म्हणाले की, काही निर्मात्यांनी तसा निर्णय घेतला असेल तर त्यांचे वेगळे प्रश्न असू शकतील. ते त्यांनी नाट्यगृहाच्या संचालक मंडळाकडे मांडले पाहिजे होते.
या संचालक मंडळाकडून योग्य मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो, असा नाट्य निर्मात्यांचा आजवरचा अनुभव आहे. अलीकडेच आमच्या संघटनेने केलेल्या मागणीनुसार, श्री शिवाजी मंदिर संचालक मंडळाने ५०० रुपये तिकिटासाठीचे दुप्पट भाडे (जे महापालिकेच्या नाट्यगृह भाड्यापेक्षा कमी होते) कमी करून दीडपट केले आहे. संगीत व प्रायोगिक नाटकांसाठी नाट्यगृहाचे भाडे २५% कमी केले आहे. तारीख वाटपातही सुसूत्रता आणि पारदर्शकता आणली आहे. ती नाट्य व्यवसायातील हेराफेरीला चाप लावणारी असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. यावर अद्याप नाट्यधर्मी निर्माता संघाच्या वतीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.