Join us

विद्यापीठ नापास : पेपर न तपासणा-या प्राध्यापकांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 3:04 AM

मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकर लागावेत, निकाल प्रक्रियेत पारदर्शकता यावी म्हणून मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या ४७७ परीक्षांच्या निकालासाठी आॅनलाइन पद्धत वापरण्यात आली.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकर लागावेत, निकाल प्रक्रियेत पारदर्शकता यावी म्हणून मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या ४७७ परीक्षांच्या निकालासाठी आॅनलाइन पद्धत वापरण्यात आली. पण ही पद्धत नवीन असल्याने काही प्राध्यापक हे उत्तरपत्रिका तपासणीसाठी न आल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. आता हिवाळी सत्राच्या परीक्षा सुरू झाल्याबरोबर विद्यापीठाने फतवा काढला आहे. जे प्राध्यापक मूल्यांकन प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.निकाल गोंधळामुळे तसेच प्राध्यापकांनी पेपर तपासणीकडे दुर्लक्ष केल्याने झालेल्या निकाल विलंबाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. निदान यंदा तरी निकालाला विलंब होऊ नये म्हणून विद्यापीठ प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ कलम ४८ (४) नुसार कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ कलम ४८(४) नुसार प्रत्येक शिक्षकाला परीक्षेचे काम करणे अनिवार्य आहे. शिक्षक आपली जबाबदारी नाकारू शकत नाहीत, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे. मूल्यांकन न केल्यास प्राध्यापकांवर कारवाई केली जाईल, असे पत्र महाविद्यालयांना लवकरच पाठविण्यात येईल, असे विद्यापीठाने जाहीर केले आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठविद्यार्थीशिक्षक