विनंती बदल्या रेंगाळल्याने अस्वस्थता! काही जण ‘मॅट’मध्ये जाण्याच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:00 AM2018-07-02T01:00:33+5:302018-07-02T01:00:41+5:30
पोलीस महासंचालक कार्यालयाकडून काढण्यात येणाऱ्या निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या विनंतीवर बदल्या रेंगाळल्याने, संबंधित इच्छुक अधिकाºयांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई : पोलीस महासंचालक कार्यालयाकडून काढण्यात येणाऱ्या निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या विनंतीवर बदल्या रेंगाळल्याने, संबंधित इच्छुक अधिकाºयांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पाल्याचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे बदलीसाठी पात्र असताना डावलल्याने काहीजण ‘मॅट’मध्ये जाण्याच्या पवित्र्यात आहेत.
या वर्षी गृहविभाग व पोलीस मुख्यालयाकडून पोलिसांच्या सर्वसाधारण बदल्यांच्या कालावधीकडे डोळेझाक करण्यात आली आहे. ३० एप्रिलपूर्वी बदल्या करण्याचे संकेत असताना, २५ मे रोजी निरीक्षकांच्या बदल्यांची पहिली यादी जारी करण्यात आली. त्यानंतर, आठवड्याभराच्या फरकाने सहायक व उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, या बदल्यांमध्ये अनेक घोळ असल्याने, अनेकांनी त्यात बदल करण्यासाठी मुख्यालयात धाव घेतली, तर काहींनी विनंती बदलीसाठी अर्ज केले. एका घटकातील कालावधी पूर्ण झालेला नसतानाही, अनेकांनी वशिले लावून मोक्याच्या ठिकाणी बदली करून घेतली. त्याउलट अनेक वर्षे साइड ब्रँचला सेवा झाल्यानंतरही पुन्हा त्यांना साइड पोस्टिंग देण्यात आली. संबंधितांपैकी काहींनी नियमानुसार बदली होईल, हे गृहीत धरून कुटुंबीयांचे स्थलांतर करून पाल्यांच्या शिक्षणासाठी नियोजित ठिकाणच्या शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र, गेल्या महिन्याभरापासून विनंती बदल्या रखडल्याने, संबंधित अधिकाºयांत निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गडचिरोलीतील अधिकाºयांचा डीजींना इशारा
गडचिरोलीत दोन वर्षे सेवा झाल्यानंतर संबंधित अधिकाºयांना पसंतीच्या ठिकाणी बदली करण्याचा शासन निर्णय आहे. मात्र, त्या ठिकाणी कालावधी पूर्ण होऊनही काही निरीक्षकांना डावलले, तर ज्यांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. त्यांच्या ‘अर्थ’पूर्ण चर्चेनंतर बदल्या केल्या आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या संबंधित अधिकाºयांनी तत्कालीन पोलीस महासंचालक सतीश माथूर यांना व्हॉट्सअॅप करून ही बाब निर्दशनास आणली. जर आम्हाला न्याय न दिल्यास, त्याविरुद्ध ‘मॅट’मध्ये धाव घेऊन बदल्यांचे ‘रॅकेट’ उघड करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे माथूर यांनी निवृत्तीच्या एक दिवस आधी संबंधित अधिकाºयांच्या बदलीचा प्रस्ताव बनविला होता. मात्र, आस्थापना मंडळातील एका सदस्याने त्यावर स्वाक्षरी न केल्याने तो रेंगाळला आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातील यादीही प्रलंबित
विनंती बदल्यांमध्ये अनेक अधिकाºयांनी मुख्यमंत्री कार्यालयातील पोलिसांच्या बदल्याचे काम पाहणाºया वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधून इच्छुक ठिकाणासाठी ‘फिल्डिंग’लावली आहे. मध्यस्थाचे काम करणाºया त्या कार्यालयातील एकाने मुख्यालयातील अधिकाºयांशी भेट घेऊन ‘व्यवहार’ पूर्ण केला आहे. मात्र, तरीही बदल्या न निघाल्याने हे अधिकारी हवालदिल झाले आहेत. पैकी काहींनी बदल्या न झाल्यास, सर्व प्रकरण चव्हाट्यावर आणण्याचा इशारा दिल्याने हा मध्यस्थही हादरून गेल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.