मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मेट्रो-७ मार्गावर कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात यु गर्डर उभारणीचे काम होणार आहे. त्यासाठी रविवार, १ जुलै रोजी विलेपार्ले ते चारकोपपर्यंत पहाटे २.३० ते ५.३० या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.मुंबई महानगरपालिका, टाटा पॉवर, रिलायन्स इन्फ्रा आणि पश्चिम रेल्वेच्या प्रतिनिधींसोबत नुकतीच प्राधिकरणाची एक बैठक झाली. या बैठकीत या भागात वीजपुरवठा करणाऱ्या वीजकंपन्यांना प्राधिकरणातर्फे यु गर्डरच्या होणाºया कामाबाबत माहिती करून देण्यात आली. यु गर्डरचे हे काम मेट्रो-७ प्रकल्पामध्ये महत्त्वाचे असल्याने या कामाला मूर्त स्वरूप देणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी विलेपार्ले ते चारकोप भागात किमान ३ तास वीजपुरवठा बंद ठेवणे गरजेचे असल्याचे प्राधिकरणातर्फे बैठकीत सांगण्यात आले. यावर सारासार विचार करून बैठकीला उपस्थित सर्व प्रतिनिधींनी रविवार, १ जुलै रोजी पहाटेच्या वेळेत हे काम करण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे हे काम प्राधिकरणातर्फे १ जुलै रोजी पहाटे होणार आहे.येथे वीज नसेल : रविवार, १ जुलै रोजी पहाटे २.३० ते ५.३० या वेळेत विलेपार्ले पश्चिम, जुहू, अंधेरी पश्चिम, वर्सोवा, जोगेश्वरी पश्चिम, गोरेगाव पश्चिम, मालाड पश्चिम, कांदिवली पश्चिम; आणि चारकोप विभागातील के-पश्चिम, पी-दक्षिण, पी-उत्तर, आर-दक्षिण, आर-मध्य आणि एच-पश्चिम या प्रभांगांमध्ये वीजपुरवठा बंद राहणार आहे.भविष्यात मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होण्यासाठी मुंबईत मेट्रो प्रकल्पांची ठिकठिकाणी उभारणी होत आहे. मेट्रो-७ प्रकल्पाचेही काम जोरात सुरू आहे. गर्डर उभारण्यासाठी वीज खंडित करण्याचा निर्णय आम्ही सर्वांच्या संमतीने घेतला आहे. मुंबईकरांनीही याला साथ द्यावी, अशी आमची विनंती आहे.- दिलीप कवठकर,प्रकल्प संचालक, एमएमआरडीए
विलेपार्ले ते चारकोप परिसरात रविवारी खंडित वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:35 AM