मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील गर्दीच्या रेल्वे स्थानकावरील खासदार निधीतून मिळालेल्या आसनांवर खासदारांची नावे दिसत असल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार प्रवासी करत आहेत.लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता १० मार्चपासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील गर्दीच्या रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या आसनावर आणि कचरा पेट्यावर खासदारांची नावे चिकटपट्ट्यांनी झाकण्यात आली होती. मात्र या चिकटपट्ट्या निखळल्याने राजकीय नेत्यांची नावे दिसून येत आहे. राजकीय नेत्यांच्या नावाच्या फलकावर टाकलेला पडदा उडाल्याने आचारसंहितेचा भंग होत आहे.मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर या स्थानकावरील प्रवाशांना बसण्यासाठी आसने आहेत. या आसनावर राजकीय नेत्याचे नाव चिकटपट्टीने झाकण्यात आले होते. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने चिकटपट्ट्या लावून देखील ही नावे दिसत आहेत. यासह काही आसनावर, कचरा पेटीवर चिकटपट्ट्या लावण्यात आल्या नाही. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून आचारसंहितेचे पालन योग्यरित्या करण्यात आले नाही, असे मत प्रवाशांनी मांडले.पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट, महालक्ष्मी या स्थानकावरील आसनावर प्रशासनाने काळ््या रंगाची चिकटपट्टी लावण्यात आल्या होत्या. मात्र या चिकटपट्या पूर्णपूणे निघाल्या असून राजकीय नेत्यांची नावे स्पष्ट दिसत आहेत. रेल्वे प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर आचारसंहितेचा भंग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 1:29 AM