नोकरभरतीच्या नमनालाच विघ्न; उमेदवार लाखांत, कंपन्यांची क्षमता काही हजारांची
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 05:52 AM2023-01-10T05:52:19+5:302023-01-10T05:52:43+5:30
नियुक्त कंपन्यांची परीक्षा घेण्याची क्षमताच नाही
- दीपक भातुसे
मुंबई : ७५ हजार सरकारी पदभरतीची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर हजारो बेरोजगार तरुणांच्या नोकरीच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच या पदभरतीच्या नमनालाच विघ्न आले आहे. ज्या दोन नावाजलेल्या कंपन्यांमार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला, त्या टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांची परीक्षा घेण्याची क्षमताच नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
आरोग्य विभाग व म्हाडा परीक्षेतील गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी या दोन कंपन्यांची निवड केली. मार्च २०१८ मध्ये गट क संवर्गातील पदभरती जाहीर झाली. ऑक्टोबर २०२२ मध्ये जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागाच्या पाच संवर्गाच्या भरतीचे वेळापत्रक जाहीर करताना ऑनलाइन परीक्षा वरील कंपन्यांमार्फत घेण्याचे घोषित झाले. यावेळी १५ लाख उमेदवार अर्ज करण्याची शक्यता आहे. मात्र, एवढ्या उमेदवारांची परीक्षा घेण्यास या दोन्ही कंपन्या सक्षम नाहीत.
भंडारा झेडपीच्या पत्रात काय ?
कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी टीसीएस आणि आयबीपीएस कंपनीचे सेंटर आहेत, त्याच ठिकाणी परीक्षा घेता येणार आहे. भंडारा जिल्ह्यात या दोन्ही कंपन्यांचे एकही परीक्षा सेंटर उपलब्ध नाही. दिलेल्या वेळापत्रकानुसार एकाच दिवशी महाराष्ट्रात परीक्षा घेणे शक्य नाही. ‘लोकमत’च्या माहितीनुसार इतर जिल्हा परिषदांनीही याच आशयाचे पत्र ग्रामविकास विभागाला पाठवले आहे.
चर्चेतून कळली क्षमता
राज्य सरकारने जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाची पदे भरण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्व जिल्हा परिषदांना भरतीची तयारी करण्याचे आदेश दिले. अनेक जिल्ह्यांनी टीसीएस आणि आयबीपीएसच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली. या चर्चेतून या कंपन्या लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ शकत नसल्याचे दिसले. भंडारा जिल्हा परिषदेने या कंपन्यांची परीक्षा घेण्याची क्षमता नसल्याने आपण भरती परीक्षा प्रक्रिया राबवू शकत नसल्याचे ग्रामविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ‘लोकमत’च्या हाती हे पत्र लागले आहे