गणेशोत्सवात एसटी संपाचे विघ्न; पुन्हा ११ सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांनी उगारले आंदोलनाचे शस्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 09:37 AM2023-08-11T09:37:09+5:302023-08-11T09:37:26+5:30
तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी २०१६ ते २०२० या कालावधीतील ४,८४९ कोटींची एकतर्फी पगारवाढ घोषित केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गणपतीला गावी जाण्याचे बेत चाकरमान्यांनी आखले असतील. अनेकांनी खासगी गाड्या वा रेल्वेला पसंती दिली असेल. मात्र, असे असले तरी बहुतांश जण महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेवर अर्थात एसटीवरच अवलंबून असतात. परंतु, आता गणेशोत्सवात एसटी संपाचे विघ्न निर्माण होण्याची शक्यता आहे. विविध मागण्यांसाठी ११ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाची हाक एसटी कामगार संघटनेने दिली आहे. १३ सप्टेंबरपर्यंत महामंडळ आणि सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास जिल्ह्याजिल्ह्यांत काम बंद आंदोलन छेडले जाणार आहे.
तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी २०१६ ते २०२० या कालावधीतील ४,८४९ कोटींची एकतर्फी पगारवाढ घोषित केली होती. त्या संदर्भातील करारही झाला. त्यातील केवळ एक हजार ८४९ कोटींचा निधीच प्राप्त झाला असून, प्रत्यक्षात तीन हजार कोटींची प्रतीक्षा आहे. या करारावर कामगार संघटनेने स्वाक्षरी केलेल्या नाहीत, असे संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले. १३ सप्टेंबरपर्यंत महामंडळाने आणि सरकारने मागणी पूर्ण केली नाही तर जिल्ह्याजिल्ह्यांत काम बंद आंदोलन छेडण्यात येणार आहे, असे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, कामगार संघटनेच्या नोटीसवर चर्चेतून तोडगा काढण्याचे प्रयत्न होत असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
कामगार संघटनेच्या २९ मागण्या
जुन्या दरपत्रकाप्रमाणे वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती बंद करून कॅशलेस योजना सुरू करणे, सण अग्रीम १२,५०० रुपये मिळणे, ई. टी. आय. मशिन, आयुर्मान पूर्ण झालेल्या बस वाहतुकीतून काढणे, कर्मचाऱ्यांसाठी अद्यावत विश्रांतीगृह, सध्याच्या एसटी कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांसह सर्व बसमधून मोफत पास, निवृत्त कर्मचाऱ्यांना १ वर्षाचा पास यासह एकूण २९ मागण्या आहेत.
गणेशोत्सवाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यासाठी एसटीच्या गाड्यांचे नियोजन सुरूही झाले आहे. गणेशोत्सव आणि दिवाळी या सणासुदीत एसटीला उत्पन्नही चांगले प्राप्त होते. मात्र, ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच कामगार संघटनेने उपोषणाची नोटीस दिली आहे.