वीजपुरवठ्यात व्यत्ययच, अघोषित भारनियमनाचा शॉक : कळवा उपकेंद्रातील बिघाडाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 12:27 AM2018-06-03T00:27:06+5:302018-06-03T00:27:06+5:30

महापारेषणच्या कळवा येथील उपकेंद्रात झालेल्या बिघाडाचा परिणाम म्हणून शुक्रवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. तो सुरळीत होण्यास शुक्रवारी रात्रीचे ९ वाजले.

Disruption of power supply, undeclared weight loss shock: result of error in sub-station sub-center | वीजपुरवठ्यात व्यत्ययच, अघोषित भारनियमनाचा शॉक : कळवा उपकेंद्रातील बिघाडाचा परिणाम

वीजपुरवठ्यात व्यत्ययच, अघोषित भारनियमनाचा शॉक : कळवा उपकेंद्रातील बिघाडाचा परिणाम

Next

मुंबई : महापारेषणच्या कळवा येथील उपकेंद्रात झालेल्या बिघाडाचा परिणाम म्हणून शुक्रवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. तो सुरळीत होण्यास शुक्रवारी रात्रीचे ९ वाजले. मात्र बिघाड कायमस्वरूपी दुरुस्त झालेला नाही. परिणामी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील नागरिकांना आणखी काही दिवस अघोषित भारनियमनाला सामोरे जावे लागेल.
महापारेषणच्या कळवा येथील उपकेंद्रातील बिघाडाच्या पार्श्वभूमीवर महावितरण, महापारेषणने विजेचा ताळमेळ राखण्यात काही प्रमाणात यश मिळविले. परिणामी, भांडुप नागरी परिमंडल अंतर्गत येत असलेल्या मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील ग्राहकांना शनिवारी थोड्याफार व्यत्ययाने वीजपुरवठा करण्यात आला. मात्र, परिस्थिती संपूर्णत: पूर्ववत होण्यास काही कालावधी लागेल. या दरम्यान ग्राहकांच्या वीजपुरवठ्यात तुरळक प्रमाणात व्यत्यय येऊ शकतो.
१ जूनला रात्री ९ वाजता ठाणे, नवी मुंबई, मुंबईतील वीजपुरवठा सुरळीत केल्याचा दावा महापारेषणने केला आहे. उरण वीजनिर्मिती केंद्रात गॅस उपलब्ध करून १०० मेगावॅट अतिरिक्त वीजनिर्मिती केली. महापे एमआयडीसीचा वीजपुरवठा ४०० के.व्ही. खारघरकडून पुरविण्यासाठी २२० के.व्ही. खारघर बोरीवली वाहिनी क्रमांक २२० के.व्ही. महापे वाहिनीस जोडण्याचे काम २ जूनला पहाटे १ वाजता पूर्ण केले. खारघर वाहिनी क्रमांक २ची क्षमता वाढविण्याचे कामही २ जूनला पूर्ण केले. त्यामुळे महापे एमआयडीसीचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत झाली.
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात भारनियमन केले नाही. कळवा उपकेंद्रातील ४००/२२० के.व्ही. ट्रान्सफॉर्मर क्रमांक १च्या वाय फेज युनिटचे आॅइल फिल्टेÑशन पूर्ण केले असून, जळालेल्या केबल काढून नव्या केबल टाकण्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.३ जून रोजी ट्रान्सफॉर्मरवर भार घेतला जाईल. परिणामी, मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल, असा दावा महापारेषणने केला आहे.

- टाटा पॉवरने ट्रॉम्बे आणि हायड्रोजन केंद्रातील वीजनिर्मिती वाढविण्यासाठी प्रयत्न केले. अद्याप विजेचे संकट दूर झाले नसल्याने या केंद्रातून वीजनिर्मितीचे कार्य सुरूच आहे. कळवा येथील उपकेंद्रात बिघाड झाला असतानाच टाटा पॉवरने खोपोली, भिवपुरी आणि भिरा या जलविद्युत निर्मिती केंद्रांत वीजनिर्मिती सुरू करून १४४ ते ४०० मेगावॅट वीज उपलब्ध करून दिली. ट्रॉम्बे केंद्रात इंधनाचा साठा वापरत ८० मेगावॅट अतिरिक्त विजेची निर्मिती केली. बोरीवलीकडे अतिरिक्त १५० मेगावॅट वीज वळविण्यासाठी नेटवर्कमध्ये बदल करण्यात आले. ट्रॉम्बे-साळशेत प्रकल्पासठी बंद ठेवण्यात आलेली धारावी-विक्रोळी लाइन सुरू करण्यात आली.
 

- महापारेषणच्या कळवा उपकेंद्रात शुक्रवारी मध्यरात्री आग लागल्यामुळे उपकेंद्रातील यंत्रणेचे मोठे नुकसान झाले.
- मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा प्रभावित झाला होता.
- ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा म्हणून महापारेषणच्या २२० केव्ही खारघर बोरीवली वाहिनी ही २२० केव्ही महापे वाहिनीस जोडण्यात आली.
- महावितरणकडून वीज मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याच्या आटोकाट प्रयत्नामुळे काही तुरळक भाग वगळता ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यात महावितरण यशस्वी झाले आहे.
- विजेची मागणी वाढल्यास यंत्रणेवर अधिकचा भार येऊन यंत्रणेत बिघाड होऊ शकतो. अशा परिस्थितीत महावितरणने ग्राहकांच्या वीजपुरवठ्यात कमीतकमी व्यत्यय येईल याकरिता नियोजन केले आहे.

Web Title: Disruption of power supply, undeclared weight loss shock: result of error in sub-station sub-center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई