“विभागप्रमुख एवढे छळू लागले, की आत्महत्या करावी असे वाटते”; शिंदे गटात असंतोष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 06:07 AM2023-08-14T06:07:30+5:302023-08-14T06:08:47+5:30
४०० पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांच्या चिरंजीवांच्या मनमानी कारभाराला कंटाळून कांदिवली, मालाड आणि चारकोप या विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसल्याची घटना ताजी असतानाच आता जोगेश्वरीतील शिंदे गटात असंतोष उफाळून आला आहे. विभागप्रमुखाच्या छळाला कंटाळून तेथील तब्बल ३५० ते ४०० पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे.
शिंदे गटाचे जोगेश्वरी पूर्व येथील विभाग क्रमांक चारचे प्रमुख विजय धिवार आणि महिला विभागप्रमुख शिल्पा वेले यांच्या छळामुळे आम्हाला आत्महत्या करावीशी वाटते, अशा उद्विग्न प्रतिक्रिया विभाग आणि शाखा संघटकांनी व्यक्त केली आहे. मात्र, या असंतोषावर शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. गेल्या वर्षभरापासून या पदाधिकाऱ्यांची कार्यपद्धती आम्ही पाहिली असून ते अकार्यक्षम असल्याचे जाणवल्याने त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीने बदलले आहे व त्यांच्या जागी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचे कीर्तिकर म्हणाले.
विभागप्रमुख विजय धिवार यांची मनमानी आम्ही सहन केली. आमच्या तक्रारी आम्ही वरिष्ठ नेते संजय मोरे, सिद्धेश कदम,नरेश म्हस्के यांच्या कानावर घातल्या. आता आमच्या जागी नव्या नियुक्त्या केल्या आहेत. धिवार यांच्या मनमानीमुळे माझ्या शाखा क्रमांक ७७ मधील १५०-२०० पदाधिकारी तर जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात ३५०-४०० पदाधिकारी राजीनाम्या तयारीत आहोत. - प्रकाश शिंदे, शाखाप्रमुख
विभागप्रमुख विजय धिवार हे पक्ष संपवायला निघाले आहे. ते महिलांचा मानसिक छळ करतात. आम्हाला दडपण आल्याने आत्महत्या करावीशी वाटते. विभागप्रमुख महिलांसोबत त्यांनी इतके घाणेरडे शब्द वापरले आहेत की आम्ही ते सांगू शकत नाही, सहन करू शकत नाही. त्यांच्या या मनमानी कारभाराला कंटाळून येथील ७ प्रभागातील महिला राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. - ॲड. सुरेखा सुर्वे, विधानसभा संघटक.