मतदार याद्यांवरून असंतोष
By admin | Published: March 19, 2015 12:07 AM2015-03-19T00:07:54+5:302015-03-19T00:07:54+5:30
महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. परंतु दुसऱ्या दिवशीही नागरिकांना याद्या मिळाल्याच नाहीत.
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. परंतु दुसऱ्या दिवशीही नागरिकांना याद्या मिळाल्याच नाहीत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा घोळ अद्याप सुरूच आहे. निवडणूक विभागाने १७ मार्चला मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात काम पूर्ण झाले नव्हते. पालिकेचे शिक्षक व इतर कर्मचारी दिवसभर प्रभागनिहाय याद्या तयार करण्यात मग्न होते. सोमवारी पूर्ण रात्रभर थांबून याद्या तयार करण्याचे काम सुरू होते. मंगळवारी दुपारी काम पूर्ण करून संध्याकाळी याद्या प्रसिद्ध झाल्याची घोषणा करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात महापालिका मुख्यालय व विभाग कार्यालयामध्ये याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या. यामुळे यादी पाहण्यासाठी गेलेल्या नागरिकांची निराशा झाली होती. बुधवारी दिवसभर इच्छुक उमेदवार मतदार यादी मिळविण्यासाठी पालिका कार्यालयात जात होते. परंतु सायंकाळपर्यंत कोणालाच यादी मिळाली नाही. पहिले दोन दिवस फुकट गेल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वेळेत याद्या मिळाल्या नाहीत तर त्यावर अभ्यास करून सूचना व हरकती मागविण्यात अडथळे निर्माण होवू शकतात, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
मतदार याद्या कधी मिळणार याविषयी नगरसेवक व इतर अनेक कार्यकर्ते पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिवसभर फोन करत होते. अधिकारी सायंकाळपर्यंत याद्या मिळतील असे सांगत होते. सायंकाळी पाच वाजता काही ठिकाणी याद्या देण्यास सुरुवात करण्यात आली.
पालिकेच्या संकेतस्थळावरही याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. प्रभाग रचनेचा अंतिम आराखडाही संकेतस्थळावर टाकण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या या चुकांविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. मतदार याद्या दोन दिवस उशिरा मिळाल्यामुळे सूचना व हरकतींसाठी दोन दिवस वाढवून मिळावेत, अशी मागणी केली जात आहे. मतदारयादीसाठी विलंब का झाला याचीही चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.
च्मतदार याद्यांविषयी सुरू असलेल्या घोळाविषयी काँगे्रस जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांनी आक्षेप घेतला आहे. प्रशासनाने तारीख जाहीर केल्यामुळे सर्व पक्षांचे उमेदवार १७ मार्चला सकाळी १० वाजताच पालिकेच्या कार्यालयात गेले होते. परंतु याद्या मिळाल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ पर्यंत याद्या उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे सूचना व हरकतींसाठी दोन दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
वेळ वाढविण्यात यावा
च्महापालिकेने १७ तारखेला मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचे घोषित केले. परंतु प्रत्यक्षात १८ मार्चला सायंकाळपर्यंत याद्या मिळाल्या नाहीत. दोन दिवस विलंब झाला असल्यामुळे सूचना व हरकतींसाठी मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.